वसईत दगडखाणीत ३५० फूट दरीत डंपर कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2024 05:46 PM2024-07-11T17:46:56+5:302024-07-11T17:47:24+5:30
दुर्घटनेत चालकासह १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- वसईच्या नवजीवन परिसरातील पिंपळे यांच्या दगड खदाणीत ३५० फूट खोल दरीत डंपर कोसळून झालेल्या अपघातात चालकासह १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पेल्हार पोलिसांनी फेटलचा गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नवजीवन येथील पिंपळे यांच्या दगड खाणीजवळ येथे डंपर चालक समद शकील शेख (२४) याने आपले ताब्यातील डंपर ही हायगयीने, अविचाराने व निष्काळजीपणे चालवुन खदानमध्ये डंपरमध्ये नरेश पवार (१४) हा बसलेला असताना गाडीसह ३५० फूट खोल दरीत कोसळला. डंपरखाली दबून नरेशच्या डोक्याला, पाठीसह हाता पायावर गंभीर दुखापती झाल्याने त्याचे मरणास व चालक समदच्या दुखापतीस कारणीभुत झाला. नरेशच्या आईने पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. खदानीत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे भुस्कलन झाल्याचा स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे.