गतिमंद ‘नकोशी’ बनली शेख-खडके कुटुंबियांची माँ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 01:02 AM2021-03-08T01:02:54+5:302021-03-08T01:03:04+5:30

सुफिया यांनी सांगितले की, माझे पती आरिफ रफिक शेख, त्यांची आई नजमा, वडील रफिक हानिफ शेख, पाच भाऊ व बहीण असे एकत्र कुटुंबात राहतो.

The dynamic ‘Nakoshi’ became the mother of the Sheikh-Khadke family | गतिमंद ‘नकोशी’ बनली शेख-खडके कुटुंबियांची माँ

गतिमंद ‘नकोशी’ बनली शेख-खडके कुटुंबियांची माँ

googlenewsNext

आशीष राणे

वसई : अंधारात कोणीतरी फेकून दिलेली मुदतपूर्व प्रसुतीतील मुलगी   आज हबीबा नावाने ओळखली जात असून या गतिमंद, परंतु असामान्य मुलीचा प्रेमाचे प्रतीक म्हणून सुफिया आरिफ शेख आणि तिचे कुटुंबीय अगदी सन्मानाने सांभाळ करीत आहेत. सहा महिन्यांपूर्वीच शेख कुटुंब विलेपार्ले व मीरा-भाईंदर येथून नालासोपारा पश्चिम भागातील श्रीप्रस्थस्थित ‘इंपिरियल शेल्टर टॉवर’मध्ये राहायला आले आहे. जाती-धर्माच्या सर्व भिंती पाडून ‘मग हिला कोण बघणार?’ या एकाच वाक्याने फक्त प्रेम द्यायचे म्हणून त्या ‘नकोशी’ला आपल्या मायेच्या कुशीत घेऊन संगोपनाच्या भावनेने मातृत्वाचे व कर्तृत्वाचे वसईत अनोखे दर्शनच जणू पाहायला मिळत आहे.

सुफिया यांनी सांगितले की, माझे पती आरिफ रफिक शेख, त्यांची आई नजमा, वडील रफिक हानिफ शेख, पाच भाऊ व बहीण असे एकत्र कुटुंबात राहतो. २९ सप्टेंबर २०१३ रोजी सायं. ६.३० वाजता (अर्धवट फाडलेल्या डिस्चार्ज कार्डवरील नोंदीनुसार) विलेपार्ले येथील एका प्रसूतीगृहात जन्मलेल्या तान्हुलीला क्षणभरही तिच्या जन्मदात्या आईची कूस व ऊब मिळाली नाहीच, परंतु ती स्त्री म्हणून जन्माला आलीय हे कळल्यावर ती तिला ‘नकोशी’ झाली. नकोशीच्या जन्मानंतर कोणी अज्ञाताने तिला पांढऱ्या फडक्यात गुंडाळून विलेपार्ले गोखले रोडवरील वनमाळी चाळीच्या ठिकाणी रात्रीच्या अंधारात झुडपात फेकले होते. मात्र उगवता सूर्य प्रत्येकाचे नशीब घेऊनच उगवतो, तसा २० तास खितपत पडलेल्या त्या नवजात अर्भकाला सुफियाची सासूबाई नजमा शेख यांनी प्रथम पाहिले आणि तत्काळ मीरा-भाईंदर येथे शिक्षिका म्हणून नोकरीनिमित्ताने राहणारी आपली सून सुफिया हिला बोलावले. क्षणभरात तिला आजीची कूस तर मिळाली, इतकेच नाही तर तासाभरात सुफियाही पोचली आणि तिने तत्काळ या ‘नकोशी’ला कुरवाळले. त्यानंतर सुफिया यांचे पती आरिफ हे नजीकच्या डॉ. अविनाश वळवळकर यांच्या क्लिनिकमध्ये या स्त्री अर्भकास तपासणीसाठी घेऊन गेले असता तपासणीअंती ते स्त्री अर्भक अत्यंत नाजूक, वजन जेमतेम एक ते सव्वा किलो आणि ते सातव्या महिन्याचे असल्याचे कळले. हे अर्भक किती तास जगेल हे काहीच सांगू शकत नाही आणि जगले तरी ते गतिमंद होईल, असेही डॉक्टरांनी सांगितले. 

दोन वर्षांपूर्वी हबीबाची बुटोक्स थेरपी म्हणून दोन्ही पायांचे ऑपरेशन केले गेले, तर यात एक इंजेक्शन ८० हजार रुपये होते. ४० दिवस दोन्ही पाय प्लास्टरमध्ये होते, हबीबाला चालता यावे हा उद्देश होता, परंतु नंतर तिच्या मणक्यातील गॅपमुळे ती उठू शकत नाही, चालू शकत नाही. तिला सहजपणे काहीही दिसू शकत नाही. तिचे संगोपन सुफिया अगदी आत्मीयतेने करतात. सुफिया, तिचे सासू-सासरे आणि सुफियाची आई आणि वडील इसाफ खडके सांगतात की, आमची हबिबा ही दौलत आहे.  आम्ही क्षणभरही तिच्यापासून दूर होत नाही. देवाची कृपा आहे की, ती आमच्या प्रेमाला आजही भावनिक प्रतिसाद देते आहे. हबीबासारख्या असामान्य मुलीबाबत असा विचार करणे हे फार थोड्या लोकांनाच जमते. अशा बालकांचा सन्मान करणाऱ्या त्या यशोदा माता व हबिबाशिवाय मी राहूच शकत नाही, असे डोळ्यांत पाणी आणून म्हणणाऱ्या व अनोखे मातृत्व स्वीकारणाऱ्या आई सुफियाला ‘लोकमत’तर्फे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जगले तर आमचे, नाहीतर देवाचे...
जगले तर आमचे, नाहीतर देवाचे, असे म्हणत काहीही करा, कितीही पैसे लागले तरी चालतील, पण या मुलीला वाचवा, असे त्यांनी डाॅक्टरांना सांगितले. या मुलीवर पुढील सहा महिने व्यवस्थित इलाज झाला. मात्र एप्रिल २०१४ मध्ये या मुलीला पहिली फिट आली. तिला डॉ. पूजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अनेक महागडे उपचार झाले. अखेरीस डॉक्टरांनी शेख कुटुंबाला सांगितले की, हे बाळ असामान्य म्हणजेच गतिमंद आहे. त्याला दिसू शकत नाही, बोलता येत नाही, चालू, फिरू व बसू शकणार नाही. त्याला संवेदना नाहीत. ते व्यवस्थित खाऊ शकणार नाही. याचे नेमके आयुष्य किती असेल तेही सांगू शकत नाही. त्यामुळे हा नाद सोडा, मात्र आरिफ व सुफिया यांनी चंगच बांधला होता.

हिंदुजा व भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये धाव
सुफिया व आरिफ यांनी हिंदुजामधल्या मोठ्या डॉक्टरांकडे धाव घेतली. तिथून या बाळास औषधे, इलाज सर्व प्रकारच्या थेरपी, फिजिओथेरपी सुरू झाल्या. लाखो रुपये खर्च केले, मात्र कुटुंबातील सर्वांची साथ असल्याने या शेख व खडके कुटुंबाने हार मानली नाही. आरिफने त्याची सर्व जमापुंजी या बाळासाठी खर्ची केली, तर या बाळाचा सांभाळ करण्यासाठी सुफियाने चक्क शिक्षण संस्थेतील उत्तम पगाराची नोकरीही सोडली.या बाळाचे नामकरण सर्वांनी हबीबा असे केले. आजही हबीबाचा सांभाळ ८व्या वर्षीही अत्यंत कौतुकाने अविरत सुरू आहे.
 

Web Title: The dynamic ‘Nakoshi’ became the mother of the Sheikh-Khadke family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.