तलासरी, डहाणूत पुन्हा भूकंपाचे धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 01:07 AM2019-09-23T01:07:54+5:302019-09-23T01:08:08+5:30
जिल्ह्यात चिंतेचे वातावरण : डहाणूत एनडीआरएफ पथकाची पाहणी
डहाणू : पालघर जिल्ह्यात धुंदलवाडी येथे शनिवारी रात्री साडेदहा वाजता ३.२ तीव्रतेचा आणि रविवारी १२.४० च्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का बसला. लागोपाठ धक्के बसल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून ग्रामस्थ घराबाहेर पडले. डहाणू तालुक्यातील आशागड, सावटा, नागझरी, घोलवड तसेच गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात या भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, एनडीआरएफच्या २१ अधिकाऱ्यांच्या टीमने डहाणू तलासरी भागातील भूकंप भागाचा दौरा करून पाहणी केली.
तलासरी - डहाणू भागात भूकंपाचे सत्र सुरूच असून या सततच्या भूकंपाने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. तीन दिवसांपासून पुन्हा येथे धक्के बसायला सुरुवात झाली असून शुक्र वारी ३.५, ३.२, २.६ रिष्टर चे तीन धक्के, शनिवारी ३.२ चा धक्का तर रविवारी दुपारी १२.४७ ला पुन्हा ३.४ रिष्टर स्केलचा मोठा धक्का बसला.
दरम्यान, भूकंपाने या भागातील घरे अंगणवाड्या, शाळाना तडे जाऊन त्या धोकादायक झाल्या आहेत त्यातच सततच्या पावसाने त्या अति धोकादायक झाल्याने त्या घरात राहायचे कसे हा प्रश्न नागरिकांना पडला असून जीव घरून ते राहत आहेत त्याच प्रमाणे धोकादायक शाळा अंगणवाड्यात आपल्या लहान बालकांना पाठवायला पालक धजावत नाहीत.
प्रशासन स्तरावर आपत्कालीन विभाग सतर्क असला तरीही दररोज घडणाºया या लहान मोठ्या धक्क्यांनी प्रशासन हतबल झाले आहे. याबाबत प्रशासनाकडून भूकंप प्रवण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. अनेक गावांमध्ये तंबू उभारले असून कित्येक शाळा आणि गावांमध्ये आपत्कालीन उपाययोजना करण्याबाबत प्रशासन कार्यरत आहे.
माङया घरात दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा मोठा धक्का जाणवला. घरातील भांडीकुंडी पडल्याने सर्वजण घाबरून घराबाहेर पडलो.
- चेतन अबोले, ग्रामस्थ, सावटा