भूकंपाची टांगती तलवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 12:33 AM2018-12-08T00:33:14+5:302018-12-08T00:33:46+5:30
जव्हारच्या वाळवंडा भागात २५ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी परिसरात घबराट निर्माण झाली होती.
- हितेन नाईक
पालघर : जव्हारच्या वाळवंडा भागात २५ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी परिसरात घबराट निर्माण झाली होती. त्यानंतर ११ वाजून ४५ मिनिटांनी ३.४ (रीश्टरस्केल) च्या धक्क्याने पूर्ण जव्हार हादरून गेले होते. यावेळी अनेक घरांना तडे गेल्याने लोक भयभीत झाले. पुन्हा २ जानेवारीला पहाटे २ वाजून २१ मिनिटांनी ३.२ रीश्टर चा धक्का बसला. अधून मधून हे सत्र सुरूच राहिले. धरणांच्या कुशीत वसलेल्या अनेक गावां जवळच हे धक्के बसू लागल्या नंतर जिल्हा प्रशासनाने या संकटाला सामोरे जाण्यासाठी काय काळजी घ्यावी याची प्रात्यक्षिके दाखवून जनजागृती करण्या पलीकडे काही केल्याचे दिसून आले नाही.
नॅशनल जिओग्राफीक ने भूकंपाची मानव निर्मित कारणे सांगतांना धरणांची मोठ्या प्रमाणात होणारी उभारणी, जमिनीच्या भूगर्भात होणारे खोदकाम, पाणी उपसा, खदाणीच्या रूपाने होणारे उत्खनन, जमिनीत व समुद्रात होणारी अणू चाचणी आदी कारणे सांगितली आहेत. जगात १६७ ठिकाणी झालेले प्रलयंकारी भूकंप मोठमोठ्या धरणांच्या निर्मितीमुळे झाल्याचा दावाही त्यांनी आपल्या वेबसाईट वर केला आहे.
जिल्ह्याचे नवनगर ४४० हेक्टर वर वसविण्याचे काम सिडकोला देण्यात आले असून सद्यपरिस्थितीत ११० हेक्टर जमिनीवर इमारती बांधण्याची कामे सुरू आहेत. तसेच जिल्हा निर्मिती नंतर हजारो रहिवासी संकुलांची कामे जिह्यातील अनेक भागात सुरू असून त्यांना लागणारा दगड, विटा, रेती, डबर या गौण-खनिजांसाठी मोठ्या प्रमाणात डोंगर फोडून, नद्या खोदून पर्यावरणाची अपरिमित हानी सुरू झाली आहे.
पर्यावरणाच्या संरचनेत एकमेकांना भूगर्भातून आतून जोडून असलेल्या अनेक डोंगर-टेकड्यांची एक साखळी निर्माण झालेली असते. हे फोडल्याने त्याच्या एकसंध बांधणीच्या मजबुतीवर परिणाम होतो, तसेच पैशाच्या अति हव्यासापोटी रहिवासी संकुलाना पिण्याचे पाणी पुरविण्याच्या नावाखाली अतिरिक्त धरणांची निर्मिती त्यातील अवाढव्य पाण्याच्या साठ्यांचे वजन भूपृष्ठावर पडले आहे. त्यामुळे हजारो वर्षात न झालेला हा बदल मोठ्या वेगाने घडू लागल्याने भूकंपाचे प्रमाण वाढू लागल्याचे मत पर्यावरण प्रेमी प्रा. भूषण भोईर यांनी लोकमत कडे व्यक्त केले आहे. इंडियन मेट्रोलॉजि विभागाच्या संकेत स्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार जिह्यात झालेल्या भूकंपाचे क्षेत्र हे धरणाच्या परिसरातीले असून एमएमआरडीए ची कार्यकक्षा बोईसर पर्यंत वाढविण्यात आल्याने त्यांचा विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर सर्व गावांच्या ग्रामपंचायतींचे अधिकार संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे गावाच्या विकासाचे अधिकार मंत्रालयात बसलेल्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या सोबत असलेल्या आयएएस लॉबीला मिळणार असून त्यांच्या मदतीने आपण निवडून दिलेले बिल्डरधार्जिणे लोकप्रतिनिधी आपल्याला विकासाच्या नावाखाली विनाशाकडे ढकलत असल्याचे विदारक दृष्य पहाण्याची वेळ मतदरांवर ओढावणार आहे.
जिल्ह्याच्या विकासाची सूत्रे सिडको, एमएमआरडीएने आपल्या ताब्यात घेतली आहेत. मग पायाभूतसुविधा निर्माण करण्याच्या नावाखाली रस्ते, भुयारी मार्ग, मेट्रो, मोनो रेल, मोठमोठे उड्डाणपूल, खाड्ड्यावरचे पूल उभारण्याचे काम हाती घेतले जाईल. तर पाण्याच्या उपलब्धतेसाठी दमण गंगा खोऱ्यांतर्गत राज्यस्तरीय प्रकल्पात पूर्ण झालेले १६ प्रकल्प असून ८ प्रकल्पाचे काम चालू आहे. तर १९ प्रकल्प भविष्यकालीन आहेत. तर स्थानिकस्तरीय पाटबंधारे प्रकल्पांतर्गत ४६ प्रकल्प पूर्ण झाले असून ७ प्रकल्पांचे काम सुरू आहे.तर १३ प्रकल्पाचे काम विचाराधीन आहेत. तर दुसरी कडे वैतरणा उपखोºयांतर्गत जिह्यातील पालघर, मोखाडा, जव्हार, वाडा, विक्रमगड, डहाणू, वसई या ७ तालुक्यात ६ मोठे प्रकल्प ७ मध्यम प्रकल्प, १९ लघु प्रकल्प अशा एकूण ५४ प्रकल्पा पैकी २६ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून १७ प्रकल्पांचे काम सुरू आहेत. तर २१ प्रकल्प प्रस्तावित आहेत. यात नाशिक आणि ठाणे जिह्याचा समावेश असला तरी बहुतांशी प्रकल्प पालघर जिह्यातील आहेत. इतक्या धरणांची निर्मिती केली जाऊन त्यात साठविलेल्या पाण्याच्या साठ्यांचा मोठा भार भूपृष्ठावर पडून भूकंपाची तीव्रता वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
सेस्मीक मॅपनुसार जगाची विभागणी ५ विभागात करण्यात आली असून भारत त्यातील २ ते ५ विभागात समाविष्ट होतो. पालघर जिल्हा हा यातील दुसºया विभागात समाविष्ट होतो. हा विभाग भूकंपाचा सर्वात कमी धोका असलेला समजला जातो. तरीही जिह्यातील इमारतींची उभारणी करतांना तिचे आरसीसी स्ट्रक्चर ६ रिष्टरस्केलच्या भूकंपाचा धक्का सहन करण्याच्या क्षमतेचे उभारण्यात येत असल्याची माहिती पालघर मधील प्रसिद्ध वास्तुविशारद महेंद्र काळे यांनी लोकमतला सांगितले.
>तलासरी, धुंदलवाडी, डहाणूमध्ये दहशत
विकासाच्या नावाखाली डोंगर फोडून, बोगदे खोदून, पर्यावरणाच्या केल्या जात असलेल्या अपरिमित हानीचे पडसाद भूगर्भात उमटू लागले आहेत.
जव्हार पासून सुरू झालेले भूकंपाचे धक्के आता ११ नोव्हेंबर २०१८ पासून तलासरी, धुंदलवाडी, डहाणू ते आता बोर्डी पर्यंत सरकू लागले आहेत. भूकंपाचे एकूण १७ धक्के या परिसराला बसलेले आहेत. जिवाच्या भीतीने हे लोक भर थंडीत घराच्या बाहेर झोपत आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना त्यांचे पालक शाळेत पाठविण्यास धजावत नसल्याने त्या ओस पडल्या आहेत. त्यावर योग्य उपाय योजना करुन काम हाती घेणे अपेक्षित असतांना जिल्हाधिकारी सुस्त, पालकमंत्री उद्घाटनांत व्यस्त, अन जनता भूकंपाने त्रस्त अशी परिस्थिती आहे.