मिरचीचे अर्थकारण बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 11:04 PM2018-04-30T23:04:09+5:302018-04-30T23:04:09+5:30
हवामानातील बदलासह प्रतिकिलोच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे मिरची उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. या पिकाकरीता गुंतवणूक केलेले पैसेही भरून निघत नसल्याने शेतकरी हवालिदल बनला आहे.
अनिरु द्ध पाटील
बोर्डी : हवामानातील बदलासह प्रतिकिलोच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे मिरची उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. या पिकाकरीता गुंतवणूक केलेले पैसेही भरून निघत नसल्याने शेतकरी हवालिदल बनला आहे.
मागील चार-पाच वर्षांपूर्वी मिरचीला चांगला दर मिळाला होता. तथापि डहाणू आणि तलासरी तालुक्यात या पिकाच्या लागवड क्षेत्रात कमालीची वाढ झाली. मात्र या हंगामात डिसेंबर महिन्यात ओखी वादळाने पाऊस आणि हवामानात बदल झाला. जमिनीतील ओलावा आणि त्यानंतर दोन-तीन महिने थंडी असल्याने बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला. राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या गारांसह पाऊस पडला. त्या वेळीही बदललेल्या हवामानाचा फटका बसून पिकावर दुष्परिणाम झाला. आगामी काळात चांगला दर मिळेल या आशेने शेतकºयांनी पैसा खर्च करून कीटकनाशक फवारणी केली. मात्र दीड मिहन्यापूर्वी फक्त तीन-चार दिवसच प्रति किलो ५० रूपयांचा दर मिळाला. त्यानंतर या हंगामात मिरचीने भाव खाल्लाच नसल्याची व्यथा शेतकºयांनी मांडली. शिवाय लागवड केलेल्या काही जातीचे बियाणे निकृष्ट दर्जाचे आणि भेसळयुक्त निघाल्याने या रोपांची अपेक्षित वाढ झालीच नाही. त्यामुळे वैतागलेल्या बळीराजाने ऐन उत्पादनाच्या काळात पिकांना पाणी देण्याचे सोडून देत, काळजावर नांगर फिरवला. ज्या जाती तगधरून राहिल्या त्यांना मिळणारा भाव खूपच कमी असून त्याच्या तोडणी करीता लागणारे मजुरीचे पैसेही भरून निघणे मुश्किल झाले आहे. शिवाय उन्हाच्या तडाख्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून फलगळतीसह त्याचा आकार व रंग यावर परिणाम दिसून येत आहे. ही सबब पुढे करून व्यापारी चांगला दर द्यायला तयार नाही. दरम्यान या पिकाकरीता गुंतवलेला पैसाही वसूल झालेला नसून मिरची उत्पादक आर्थिक संकटाचा सामना करीत आहे.