सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:53 PM2019-12-31T23:53:38+5:302019-12-31T23:53:48+5:30
जि.प. चे तीन गट, पंचायत समितीचे दोन गण
पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ गटांपैकी ३ गट बिनविरोध झाल्याने उर्वरित ५४ गटांसाठी २२० उमेदवार रिंगणात आहेत, तर ११४ पंचायत समितीपैकी २ गणाचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने ११२ गणांसाठी एकूण ४३१ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील महाआघाडी स्थापन करून सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआ या राजकीय पक्षांचे गणित जिल्ह्यात बिघडल्याने सर्व पक्षांनी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाने २३ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या ५६ गणांसाठी उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेने ४६ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या ९४ गणांसाठी उमेदवार उभे केले आहेत. भाजप ४५ जिल्हा परिषद गट तर ९४ पंचायत समिती गणांसाठी लढत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे १६ जिल्हा परिषद गटासाठी उमेदवार उभे केले असून पंचायत समिती गणासाठी ३८ उमेदवार उभे आहेत. काँग्रेस पक्षाचे १० उमेदवार जिल्हा परिषद गटासाठी, तर १३ उमेदवार पंचायत समिती गणासाठी उभे आहेत. बहुजन विकास आघाडीकडून जिल्हा परिषद गटाकडून १५ उमेदवार रिंगणात असून ३६ उमेदवार पंचायत समिती गणासाठी रिंगणात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जिल्हा परिषद गटासाठी ९ उमेदवार तर पंचायत समितीसाठी २१ उमेदवार रिंगणात आहेत. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जि.प. गटासाठी १ तर पंचायत समिती गणासाठी शून्य, बहुजन मुक्ती मोर्चाकडून १ पंचायत समिती गणासाठी उमेदवार उभा असून जिल्हा परिषदेच्या गटासाठी ३७ अपक्ष उभे असून ७८ अपक्ष रिंगणात आहेत.
तलासरी तालुक्यात माकपचे आमदार विनोद निकोले हे निवडून आल्याने माकपची राजकीय शक्ती वाढली आहे. त्यांना बविआची साथ मिळणार असल्याने विरोधात लढणाºया भाजप-सेनेला ही लढाई जिकिरीची बनणार आहे.
एकमेकांना अडचणीचे ठरताहेत विविध उमेदवार
वसईत जि.प.च्या ३ जागांसाठी १० व पंचायत समितीच्या ७ जागांसाठी २२ उमेदवार उभे आहेत. येथे जि. प.च्या एका गटात बविआविरुद्ध सेना, भाजप व काँग्रेस तर दुसºया एका गटात सेना विरुद्ध भाजप तर तिसºया गटात बविआ विरुद्ध भाजप अशी लढत रंगणार आहे.
वाडा तालुक्यात राष्ट्रवादी, माकप, बविआ, काँग्रेस अशी आघाडी असल्याचे निदर्शनास येत असले तरी जि.प.च्या एका जागेवर राष्ट्रवादी, बविआ, एका जागेवर राष्ट्रवादी-माकपचे उमेदवार एकमेकांना अडचणीचे ठरत आहेत. पंचायत समितीच्या लढतीतही असेच चित्र आहे.