पालघर जिल्ह्यात ईद अत्यंत उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:39 AM2018-11-22T00:39:30+5:302018-11-22T00:40:55+5:30

इस्लाम धर्माचे प्रेषित शांती आणि बंधुभावाचा संदेश देणारे महंमद पैगंबर यांचा जन्मदिन म्हणजेच ईद डहाणू शहर, डहाणू गाव, चिंचणी, तारापूर, कासा, वरोती, सावटा, अशागड, चारोटी येथे मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरी केली.

 Eid celebrated with great enthusiasm in Palghar district | पालघर जिल्ह्यात ईद अत्यंत उत्साहात साजरी

पालघर जिल्ह्यात ईद अत्यंत उत्साहात साजरी

Next

डहाणू : इस्लाम धर्माचे प्रेषित शांती आणि बंधुभावाचा संदेश देणारे महंमद पैगंबर यांचा जन्मदिन म्हणजेच ईद डहाणू शहर, डहाणू गाव, चिंचणी, तारापूर, कासा, वरोती, सावटा, अशागड, चारोटी येथे मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरी केली.
सर्वत्र शांततेत मिवणूका काढून मुस्लिम समाजातील बहुसंख्य दानशुरांनी यावेळी शरबत, मिठाई, चॉकलेट, बिर्याणी तसेच इतर गोड पदार्थांचे वाटप करून हा सण मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावर्षी देखील चिंचणी, तारापूर, डहाणू तसेच परिसरात ईद निमित्ताने मस्जिद, दरगाह, ईदगाह तसेच प्रत्येक मोहल्ल्यात विविध प्रकारची रोषणाई करून गाव सजविण्यात आले होते. या निमित्ताने गावातील धार्मिक स्थळांची रंगरंगोटी केल्याने व लावलेल्या पताकांनी गाव शोभून दिसत होते. ईद-ए-मिलाद म्हणजेच मुस्लिम धर्माचे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिन. त्याचे औचित्य साधून मुस्लिम बांधवांनी मोठ मोठया मिरवणुका काढल्या होत्या.
मंगळवारी संध्याकाळपासूनच चिंचणी, तारापूर, डहाणू शहरामध्ये मुस्लिमांची मोठी गर्दी दिसून येत होती. आज पहाटे तर हजारो मुस्लिम बांधवांची मशिदीत गर्दी उसळली होती. त्यानंतर सकाळी मिरवणूका काढण्यात आल्या होत्या यावेळी रस्त्यावर तसेच नाक्यानाक्यावर शरबत, मिठाई, लाडू आणि चॉकलेटचे वाटप करण्यात येत होते. दरम्यान संध्याकाळी अनेक गावात लहान मुलांच्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी समाजातील विश्वस्त मंडळांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले होते. दरम्यान महंमद पैैगंबर यांच्या जन्मदिनामिमित्त आज शेकडो विधवा, अपंग, निराधार, गरीबांना आर्थिक मदतीबरोबर जेवण, तसेच कपडयांचे वाटप करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अत्यंत चोख ठेवली होती.

टेन, मनोर, टाकवाहाळमध्ये रोषणाई
मनोर : हजरत मोहंमद पैगंम्बर यांचा जन्म दिन असलेला ईद ए मिलाद हा सण मोठ्या उत्साहात टेन, टाकवाहाळ, व मनोर मध्ये मुस्लिम बांधवांनी साजरा केला त्या वेळी ठिक ठिकाणी जुलूस काढण्यात आले होते. इस्लामिक साला प्रमाणे रबीउल अव्वल महिन्याच्या १२ तारखेला इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर हजरत मोहंम्मद यांचा जन्म झाला होता त्या निमित्त त्यांचे स्मरण करून मुस्लिम बांधव बुधवारी आनंद साजरा करतात तसेच टेन टाकवाहाळ मनोर गावात जागो जागी झेंडे लावून मशिदी मध्ये रोषणाई करण्यात आली होती. टेन जामा मस्जिद ते टेन नाका आशिया मशिदीपर्यंत , टाकवाहाळ ते रेंजड पाडा, तसेच मनोर मशिद ते मनोर नाका, बाजार पेठ पोलीस ठाणे मार्ग जुलुस काढण्यात आला होता. पहाटे पाच च्या सुमारास सर्व मशिदी मध्ये सलाम पढण्यात आले त्यानंतर फजरची नमाज अदा करण्यात आली व न्याज वाटप केले. मुस्लिम बांधवांत आनंदी वातावरण होते.

वाड्यात ईद मोठ्या
जल्लोषात
वाडा : या तालुक्यात मुस्लिम बहुल असलेल्या गावात रॅलीचे आयोजन करून ईद उत्साहात साजरी करण्यात आली. कुडूस येथे मशिदीपासून रॅलीला सुरु वात करून ती पूर्ण गावात फिरवण्यात आली. तर नारे येथे रॅली ही वडवली पर्यंत नेण्यात आली. याचप्रमाणे वाडा खानिवली आदी ठिकाणी देखील नमाज अदा करून, रॅली काढून मोठ्या उत्साहात ती साजरी करण्यात आली. कुडूस येथे रॅलीत मुस्तफा मेमन, नोमान पटेल, आयाज पटेल, सलमान पटेल आदीसह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. या निमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title:  Eid celebrated with great enthusiasm in Palghar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर