तारापूर स्फोटातील मृतांची संख्या आठवर; ढिगाऱ्याखाली आढळले आणखी दोन मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 01:43 AM2020-01-13T01:43:48+5:302020-01-13T02:28:20+5:30
कारखान्याच्या ज्या इमारतीत धोकादायक रसायनांची चाचणी सुरू होती,
बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील एएनके फार्मा प्रा. लि. (जुने नाव ‘तारा नायट्रेट’) या रासायनिक कारखान्यात शनिवारी रात्री झालेल्या रिअॅक्टरच्या स्फोटातील मृतांची संख्या आठ झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या सात जणांवर उपचार सुरू असून, त्यात कारखान्याचे मालक नटवरलाल पटेल यांचा समावेश आहे.
पुरेशी काळजी न घेता अमोनियम नायट्रेटचे केलेले उत्पादन या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी एमआयडीच्या सुरक्षा आणि आरोग्य महासंचालकांना दुर्घटनेचा अहवाल देण्यास सांगितले आहे. त्यासाठी या विभागाच्या विविध अधिकाऱ्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली आणि रसायनांचे नमुनेही घेतले. कारखान्याच्या इमारतीचे बांधकामही पूर्ण झालेले नसताना कोणत्या अधिकाºयांनी उत्पादनासाठी परवानग्या दिल्या, याचा तपासही करण्यात येणार आहे.
इमारतीच्या ढिगाºयाखालून अग्निशमन दल व एनडीआरएफच्या जवानांनी रविवारी सकाळी श्रीनाथ दासरी (४०), तर दुपारी खुशी सुरेंद्र यादव (१३) यांचे मृतदेह बाहेर काढले.
कारखान्याच्या ज्या इमारतीत धोकादायक रसायनांची चाचणी सुरू होती, त्याच इमारतीमध्ये यादव व सिंग ही कुटुंबे राहत होती. या स्फोटात यादव कुटुंबातील तीन, तर सिंग कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि दोन्ही कुटुंबांतील चार जण जखमी झाले आहेत. यापैकी दोघांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर कारखान्याचे मालक नटवरलाल पटेल यांना मीरा रोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एम-२ या प्लॉटवर कारखान्यासाठी दोन मजली इमारत उभारण्याचे काम सुरू होते. संबंधित व्यवस्थापनाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ग्रँट आॅफ फर्स्ट कन्सेंट टू आॅपरेट अंडर रेड/एसएस कॅटेगरीची परवानगी २ जानेवारीला घेतली आणि प्रायोगिक तत्त्वावर दोन दिवसांपासून उत्पादन सुरू केले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, अग्निशमन दल, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून संपूर्ण परवानग्या न घेताच, येथे अमोनियम नायट्रेटचे उत्पादन सुरू केले होते. या स्फोटाची माहिती मिळताच, रात्री उशिरा पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. सकाळी शिवसेना नेते रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वनगा, खासदार राजेंद्र गावित, दुपारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली.