अठरावर्षीय आमदार बनला ग्रामविकासमंत्री; डहाणूतील विद्यार्थ्याचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 11:18 PM2019-09-08T23:18:12+5:302019-09-08T23:18:25+5:30
युवा संसद स्पर्धेत सांभाळले दोन्ही सभागृहांचे कामकाज
डहाणू/बोर्डी : राज्यस्तरीय युवा छात्र संसद स्पर्धेच्या माध्यमातून दोन दिवस दोन्ही सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याची संधी पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डहाणूतील प्रथमेश संतोष अंकारम या अठरावर्षीय विद्यार्थ्याला मिळाली. त्याने तेथे ग्रामविकास मंत्रीपदाची धुरा सांभाळली. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या अभिरूप कामकाजातून आदर्श राज्याची संकल्पना सकारायला मिळाल्याचा अनुभव त्याने लोकमतशी बोलताना कथन केला.
या स्पर्धेकरिता राज्यातील सुमारे दोनलक्ष विद्यार्थ्यांमधून १०८ सदस्यांची अंतिम निवड करण्यात आली होती. पालघर जिल्ह्यातून प्रथमेश अव्वल आल्याने त्याला ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी विधिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. पहिल्या दिवशी सकाळी दहा वाजता मानवी हक्क मुख्यालयात नोंदणी केल्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनल्सनजीकच्या हॉटेलात त्यांना राहण्याची सुविधा पुरविण्यात आली. भोजनानंतर विधानभवनात जाण्याची संधी मिळाली. तेथे विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहाची कार्यपद्धती तेथील अधिकाऱ्यांनी उपस्थित स्पर्धकांना समजावून सांगितली. दुपारसत्रात शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी युवा सदस्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. हा क्षण माझ्याकरिता महत्वाचा होता, कारण मंत्री साहेबांनी पालघरचे प्रतिनिधित्व कोण करतय म्हणून विचारणा केली. त्यामुळे अभिमानाने छाती फुललीच, शिवाय डोळ्यातून आपसूकच आनंदाश्रू ओघळले. त्यानंतर मुख्यमंत्री, अध्यक्ष, सभापती, आणि मंत्रिमंडळ निवडताना खाते वाटप करण्यात आले. माझ्याकडे ग्रामविकास खात्याची धुरा सोपवली गेली. त्यावेळी क्षणार्धात पंकजा मुंडे यांचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहिल्याचे तो म्हणाला.
दुसºया दिवशी सकाळी आठ वाजता विधानसभा परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता विनोद तावडे आणि आशिष शेलार हे मंत्री उपस्थित होते. यावेळी युवा संसद स्पर्धेतून निवडलेल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर अल्पोपहार काळात सर्व युवा आमदारांना फेटे बांधण्यात आले. साधारणत: अकरा वाजता विधानसभेच्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर या सभागृहाच्या शिष्टाचारानुसार कामकाजाला सुरु वात झाली. यावेळी विरोधी पक्षाच्या बाकावरुन आमदारांनी विविध शासकीय योजनांबाबात प्रश्न विचारले. त्याला त्या-त्या खात्याच्या मंत्र्यांनी उत्तरे दिली. दुपारच्या भोजनानंतर विधानसभेचे कामकाज सुरू झाले.
शालेय अभ्यासासह चालू घडामोडी, अवांतर ज्ञान याची माहिती आवश्यक आहे. त्यामुळेच प्रथमेशला हा अनुभव घेता आला. या स्पर्धेच्या माध्यमातून शासन युवा पिढीचा विचार करते ही सकारात्मक बाब आहे. - संतोष अंकारम, प्रथमेशचे वडील
हा स्वप्नवत अनुभव होता. दोन्ही सभागृहाचे कामकाज करताना पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यास मिळाले. आपले राज्य आणिदेशाच्या विकासाकरिता राजकारण आणि प्रशासनाच्या माध्यमातून भरीव योगदान देण्याचा संकल्प केला आहे. - प्रथमेश अंकारम, युवा संसदेत, पालघर जिल्ह्याचा प्रतींनिधी