निवडणूकधार्जिणा अर्थसंकल्प?, १६ मार्चला महासभेत होणार सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 01:04 AM2020-03-06T01:04:02+5:302020-03-06T01:04:09+5:30
या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वसई-विरार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी पालिकेचा हजारो कोटी बजेट असलेला शिलकी अर्थसंकल्प सादर केला आहे.
वसई : मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वसई-विरार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी पालिकेचा हजारो कोटी बजेट असलेला शिलकी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर शुक्रवार, दि. ६ मार्च रोजी महापालिकेच्या स्थायी समितीत चर्चा होणार असून, १६ मार्चला महासभेत सादर केला जाणार आहे. यानंतर ३० मार्चला अंतिम टप्प्यात सुधारणा करून मंजुरी घेण्यात येणार आहे.
स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत राऊत यांनी ही माहिती दिली. महापालिका प्रशासनाने याच वेळी परिवहनचाही ७३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला आहे. यात परिवहन नियंत्रण कक्ष, ई-बस सेवा, अत्याधुनिक परिवहन आगार अशा विविध घोषणा असलेल्या परिवहन समितीच्या साधारणपणे ७३ कोटींच्या अर्थसंकल्पास स्थायी समितीत चर्चेअंती मंजुरी देण्यात आली. यामध्ये प्रदूषणविरहित इलेक्ट्रिक बससाठीही तरतूद करण्यात आली आहे. वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाचा २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी परिवहन सभापती प्रीतेश पाटील यांनी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्याकडे सादर केला. एकूण ७३ कोटी रु पयांच्या या अर्थसंकल्पावर चर्चा करून स्थायी समितीमार्फत अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. या वर्षी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अगदी परिवहन खात्यात अनेक नवीन सुविधा आणि सुधारणा या अर्थसंकल्पात मांडण्यात आल्या आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरातील वाढते प्रदूषण आणि इंधनाची बचत करण्यासाठी इलेक्ट्रिक बस आणण्याची विशेष घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी पालिकेने आपल्या अंदाजपत्रकात २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
दरम्यान, महापालिकेची परिवहन सेवा खासगी कंत्राटदारामार्फत चालवली जाते. त्यामुळे बस प्रवासाला लागणारा अवधी, प्रवासी संख्या, बस कुठे पोहोचली किंवा कधी पोचेल अथवा यावर पालिकेचे नियंत्रण असावे, अशी मागणी होत आहे.
>३० मार्चला अंतिम टप्प्यात सुधारणा करून मंजुरी?
वसई विरार शहर महानगरपालिका २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे शिलकी अंदाजपत्रक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांना नुकतेच सादर केले. या अंदाजपत्रकावर स्थायी समितीत शुक्रवार दि. ६ मार्च रोजी चर्चा होणार आहे. काही शिफारशींसह १६ मार्च रोजी पालिकेच्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सादर केले जाईल व त्यास ३० मार्चला अंतिम टप्प्यात सुधारणा करून मंजुरी घेण्यात येईल. मागील वेळी २२०० कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मात्र या वेळी निवडणुका व विकासकामे बघता त्यात वाढ होईल, अशी शक्यता आहे.निवडणूक जवळ आली असता चारच दिवसांपूर्वी प्रभाग आरक्षण सोडत निघाली. यात महापालिकेचे बहुतांश प्रभाग व वार्ड यात आरक्षण बदलामुळे प्रस्थापित व दिगज्जांची डोकेदुखी वाढली असल्याने निदान अर्थसंकल्पामुळे तरी ही तूट भरून जाईल, अशी कुठेतरी आता आशा सत्ताधारी नगरसेवक यांना वाटते आहे. ज्येष्ठ नागरिक, कर्करोगग्रस्त, दिव्यांगांसाठी मोफत बसपास योजना असून यासाठी चार कोटी ८० लाखांची तरतूद केली आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना बस डेपोलगत विश्रांतीगृह, उपाहारगृह यासाठी एक कोटीची तरतूद केली आहे. तर, अद्ययावत परिवहन भवनाच्या कामासाठी ३९ कोटींची तरतूद केली आहे.