डहाणू तालुक्यातील निवडणुका शांततेत , आज मतमोजणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 12:10 AM2019-06-24T00:10:22+5:302019-06-24T00:10:51+5:30
डहाणू तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीलगत असलेल्या ६ ग्रामपंचायतीच्या सार्वित्रक निवडणुका रविवारी शांततेत पार पडल्या.
डहाणू - तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीलगत असलेल्या ६ ग्रामपंचायतीच्या सार्वित्रक निवडणुका रविवारी शांततेत पार पडल्या. सहा ग्रामपंचायतीच्या एकूण ५२ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये १६ उमेदवार बिनविरोध झाले तर ७ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत १६ उमेदवार उभे होते. या निवडणुकीत काही ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या प्रभागात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली नसल्याचे दिसून आले.
पश्चिम भागातील धाकटी डहाणू, पोखरण, गुंगवाडा, बाडापोखरण, तडीयाले, अभ्राम - धुमकेत या सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर या निवडणुका होत असल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी( दि.२४ ) होणार असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग हे काम पाहणार आहेत.
पोखरण ग्रामपंचायतीत ७ जागांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले नाही. गुंगवाडा येथे ७ पैकी एका जागेवर जयवंत हरेश्वर दवणे हे बिनविरोध निवडून आले मात्र ६ जागांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही.
धाकटी डहाणूत १३ पैकी २ जागांसाठी नामनिर्देशन सादर केले नाही. येथे एका जागेसाठी निवडणूक होत असून दोन उमेदवार समोरासमोर उभे आहेत. ग्रामपंचायत बाडापोखरण (४ जागा), तडीयाले (४), अभ्रम - धुमकेत (7) या जागांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली नाहीत.