वसईच्या रस्त्यावर धावणार इलेक्ट्रीक बस; अत्याधुनिक परिवहन आगारासह नवीन बसेसही आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:46 AM2020-02-06T00:46:39+5:302020-02-06T00:47:04+5:30

अंदाजपत्रक सादर

An electric bus that runs on the streets of Vasai; It will also bring new buses along with advanced transportation facilities | वसईच्या रस्त्यावर धावणार इलेक्ट्रीक बस; अत्याधुनिक परिवहन आगारासह नवीन बसेसही आणणार

वसईच्या रस्त्यावर धावणार इलेक्ट्रीक बस; अत्याधुनिक परिवहन आगारासह नवीन बसेसही आणणार

Next

नालासोपारा : वसईच्या रस्त्यांवर लवकरच ईलेक्ट्रिकल बस धावण्याची शक्यता आहे. वसई - विरार महापालिकेने सादर केलेल्या परिवहन विभागाच्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली आहे. २०२० - २१ या वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक परिवहनने स्थायी समितीला सादर केले. एकूण ७१ कोटी रुपयांचे आणि एक कोटी रुपयांचे हे शिलकीचे अंदाजपत्रक आहे. नवीन ४० बसेसचा ताफा, इलेक्ट्रीक बस, अत्याधुनिक परिवहन आगार, नवीन बस मार्गांची घोषणा या अंदाजपत्रकात करण्यात आलेली आहे. या अंदाजपत्रकावर परिवहन समितीकडून चर्चेनंतर सुधारणा केल्यानंतर स्थायी समितीमार्फत अंतिम मंजूरी देण्यात येणार आहे.

वसईच्या रस्त्यावर इलेक्ट्रीक बस धावणार

सध्या पालिकेच्या ताफ्यात १६० बसेस आहेत. त्यापैकी १३० बसेस या मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट प्रा. लिमिटेड या ठेकेदाराच्या आहेत. शहरातील वाढते प्रदूषण आणि इंधनाची बचत करण्यासाठी इलेक्ट्रीक बसेस आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. वसई - विरार महापालिकेची परिवहन सेवा खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. त्यामुळे पालिकेने स्वत:चा नियंत्रण कक्ष उभारण्याचे ठरवले आहे.

अत्याधुनिक परिवहन आगार

पालिकेने विरार पश्चिमेच्या यशवंत नगर येथे अत्याधुनिक परिवहन आगार बनविण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी यंदा ३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढील काही महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. पालिकेचे मुख्यालय येथे स्थलांतरीत केले जाणार आहे.

१५ हजार ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास

पालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केलेली आहे. आतापर्यंत १५ हजार ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. यासाठी ज्येष्ठ नागरिकांना स्थानिक प्रभागातून मोफत पासेसचे वितरण करण्यात येत आहे. या ज्येष्ठ नागरिकांमुळे प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे परिवहन सभापती प्रीतेश पाटील यांनी सांगितले. पालिकेतर्फे मराठी आणि इतर प्रादेशिक भाषेतील शाळांमधील विद्यार्थ्यांना शंभर टक्के मोफत प्रवास दिला जातो. त्याची ५० टक्के रक्कम पालिका तर ५० टक्के रक्कम ठेकेदार भरतो. सध्या साडे आठ हजार विद्यार्थी या सवलतीचा लाभ घेत आहेत. याशिवाय इंग्रजी माध्यमातील साडे चार हजार विद्यार्थ्यांना मासिक भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येते. ही सवलत ठेकेदारामार्फत देण्यात येत असते.

नवीन बसेस आणणार, मात्र पर्यटन दर्शन बस बारगळली

पालिकेची बस सेवा ४३ मार्गांवर चालते. यंदा ४० नव्या बसेस रस्त्यावर आणण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानंतर नवीन मार्गावर सेवा देण्याचा मनोदय या अंदाजपत्रकात व्यक्त करण्यात आला आहे. पालिकेने दोन वर्षांपूर्वी वसईचे पर्यटन घडविणारी पर्यटन बस सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मात्र बसेसची मर्यादीत संख्या लक्षात घेता यंदा ही सेवा योजना बारगळली आहे. बसेसची संख्या वाढल्यानंतर पर्यटन बस सुरू करण्यात येईल, असे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

वसईच्या रस्त्यावर इलेक्ट्रीक बस सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रशासानाने जे अंदाजपत्रक सादर केले आहे त्यावर चर्चा करून सुधारीत अंदाजपत्रक स्थायीमध्ये सादर केले जाईल. या माध्यमातून नागरिकांना अधिकाअधिका चांगल्या सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत पास योजननेमुळे परिवहनची प्रवासी संख्या वाढली आहे.
- प्रितेश पाटील, सभापती, परिवहन समतिी, वसई विरार महापालिका

Web Title: An electric bus that runs on the streets of Vasai; It will also bring new buses along with advanced transportation facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.