वीजबिल केंद्रे उघडली; आता बिलेही घरपोच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:34 PM2020-06-12T23:34:41+5:302020-06-12T23:34:47+5:30

महावितरणला परवानगी : नियम पाळून मीटर रीडिंग घेण्याची वसई-विरार महापालिकेने घातली अट

Electricity bill centers opened; Now the bills will also be delivered to the house | वीजबिल केंद्रे उघडली; आता बिलेही घरपोच मिळणार

वीजबिल केंद्रे उघडली; आता बिलेही घरपोच मिळणार

Next

आशीष राणे।

वसई : महावितरणच्या वसई-विरारमधील वीज बिल केंद्रांना बिले घेण्यासाठी शासनाने सशर्त परवानगी दिल्यावर आता वसई-विरारमधील वीजग्राहकांना लवकरच वीज बिलेदेखील घरपोच मिळणार असल्याची माहिती महावितरणने दिली. दरम्यान, वसई-विरार शहर महापालिकेने ग्राहकांच्या वीज मीटरचे रीडिंग घेण्यासही महावितरणला परवानगी दिली आहे.

३१ मे नंतरच्या अनलॉक नियमानुसार आता महावितरणने रीडिंग घेण्याच्या कामाला ठिकठिकाणी सुरुवात केली असून पुढील चार-पाच दिवसांत वीजग्राहकांना वीजबिलेही घरपोच देण्यात येणार आहेत. लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा होत असला तरी विजेची बिले मात्र मागील दोन महिन्यांपासून घरपोच मिळत नव्हती. त्यातच महावितरणने नागरिकांना मधल्या काळात त्यांच्या मीटर रीडिंगची छायाचित्रे अपलोड करण्यास सांगितले होते. मात्र अगदी नाममात्र प्रमाणात ठराविक वीजग्राहकांनी महावितरणच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला होता.
वीजग्राहकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने वसईतील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मागील महिन्यात महापालिकेकडे वीजग्राहकांचे रीडिंग घेण्यास परवानगी मागितली होती. मात्र मे महिन्यात महापालिकेने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही परवानगी नाकारली होती. परंतु दि. ८ जूनला लॉकडाऊन शिथिल झाल्यावर महापालिकेने महावितरणला लेखी परवानगी दिली आहे. यानुसार वीजग्राहकांचे मीटर रीडिंग घेणे, बिलाची छपाई करणे तसेच घरोघरी वीजबिल वाटपाची परवानगी दिली आहे. अपवाद फक्त वसई-विरार शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात वीजबिल वाटण्यास महापालिकेकडून मनाई करण्यात आली आहे. तसेच रीडिंग घेणाºया आणि बिले वाटणाºया कर्मचाऱ्यांना मास्क लावणे आणि सुरक्षित अंतर ठेवत वेळोवेळी हात धूत राहणे या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची सक्तीही करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरण कंपनीने सरासरी बिले महावितरणच्या वेबसाइटवर टाकली होती. वसई तालुक्यात सुमारे साडेआठ लाख वीजग्राहक आहेत. आता नव्याने येणारी बिले ही मागील तीन ते साडेतीन महिन्यांची जोडून येणार आहेत. त्यामुळे बिलाची रक्कमही वाढीव येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना एकत्र बिल भरणे शक्य होणार नाही, अशी चिन्हे आहेत.

येत्या आठ ते दहा दिवसांत सर्व ग्राहकांना वीजबिले मिळतील. फार कमी-अधिक वीजग्राहकांनी मीटर रीडिंगची छायाचित्रे साइटवर अपलोड केल्याने सरासरी वीजबिले पाठवावी लागली आहेत. मात्र आता ३१ मे नंतरच्या ‘अनलॉक’मध्ये शिथिलता आल्याने वीजग्राहकांनी लवकरात लवकर वीजबिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे.
- मंदार अत्रे, प्रभारी अधीक्षक अभियंता, वसई सर्कल

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेल्या अडीच महिन्यांपासून बंद करण्यात आलेले ग्राहकांच्या वीजमीटरचे रीडिंग आणि वीजबिलवाटप महावितरणकडून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. कल्याण परिमंडलात प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून इतर ठिकाणी योग्य दक्षता बाळगण्याच्या हमीवर प्रशासनाने दिलेल्या परवानगीनुसार मीटर रीडिंग व वीजबिल वाटपास सुरुवात करण्यात आली असून या कामात कर्मचाºयांना सहकार्य करावे.
- दिनेश अग्रवाल,
मुख्य अभियंता कल्याण

Web Title: Electricity bill centers opened; Now the bills will also be delivered to the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.