आठ महिन्यांनी मिळाली वीज
By admin | Published: October 28, 2015 11:11 PM2015-10-28T23:11:02+5:302015-10-28T23:11:02+5:30
आठ महिन्यांपासून खंडित झालेला वीजपुरवठा दिवाळीच्या आधीच पूर्ववत झाल्याने डहाणूतील नरपड गावच्या ठाकूरवाडीच्या साठीतल्या ठाकूर दाम्पत्याने ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.
बोर्डी : आठ महिन्यांपासून खंडित झालेला वीजपुरवठा दिवाळीच्या आधीच पूर्ववत झाल्याने डहाणूतील नरपड गावच्या ठाकूरवाडीच्या साठीतल्या ठाकूर दाम्पत्याने ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.
डहाणू तालुक्यातील नरपड गावच्या ठाकूरवाडी येथे लक्ष्मण केशन ठाकूर (६३) आणि पार्वती (६१) हे राहतात. दहा वर्षांपूर्वी अपघातात लक्ष्मण यांना अंधत्व आले. त्यामुळे ते अंथरुणाला खिळूनच असतात. पतीची शुश्रूषा केल्यानंतर परिसरातील गावात फिरून कडधान्य विकून पार्वती संसाराचा डोलारा सांभाळते. तिन्ही मुली विवाहानंतर सासरी गेल्याने पती-पत्नी दोघेच असतात. आठ महिन्यांपूर्वी वीजमीटरमधील बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला. याकरिता, डहाणू वीज वितरणच्या नरपड कार्यालयात पार्वती यांनी तक्रार केली. परंतु, तांत्रिक कारणास्तव आठ महिने त्यांना विजेपासून वंचित ठेवण्यात आले. लोकमतच्या पाठपुरव्यानंतर तेथील कोल्हे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंगळवारी वीजजोडणी करून दिली. (वार्ताहर)