स्कूलबस झाडावर धडकल्याने अकरा विद्यार्थी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 01:56 AM2019-02-12T01:56:26+5:302019-02-12T01:56:35+5:30
पालघर येथील सर जे. पी. इंटरनॅशनल स्कूलच्या बसला माहीमजवळील पाणेरी नदीजवळ भीषण अपघात झाला. शाळेतील ११ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने सोमवारी झालेल्या अपघातात विद्यार्थ्यांसह चालक जखमी झाला.
पालघर : पालघर येथील सर जे. पी. इंटरनॅशनल स्कूलच्या बसला माहीमजवळील पाणेरी नदीजवळ भीषण अपघात झाला. शाळेतील ११ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने सोमवारी झालेल्या अपघातात विद्यार्थ्यांसह चालक जखमी झाला. जखमींपैकी ३ विद्यार्थ्यांसह चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित ८ विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणी बसचालक विष्णू पाटीलविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पालघर-माहीम रस्त्यावरील हरणवाडी येथे जे. पी. इंटरनॅशनल ही पहिली ते दहावीपर्यंतची शाळा आहे. सोमवारी सकाळच्या सत्राची शाळा सुटल्यानंतर केळवे आणि मायखोप येथील प्राथमिकच्या ११ विद्यार्थ्यांना घेऊन दुपारी १ च्या सुमारास स्कूलबस निघाली. ती पानेरीच्या वळणावर आली असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला एका वडाच्या झाडाला धडकली.
या अपघातात बसच्या टपासह आजूबाजूचा पत्रा उडून गेला. मुलांची रडारड पाहून माहीम गावातील लोकांनी जखमी विद्यार्थ्यांना मिळेल, त्या वाहनाने पालघरच्या ग्रामीण व खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, योग्य उपचार न मिळाल्याने त्यांना पालघरच्याच ढवळे रुग्णालयात दाखल केले. या वेळी शाळा व्यवस्थापनाकडून उशिरापर्यंत कोणीही उपस्थित नसल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण होते.
मुलांना जखमी अवस्थेत पाहिल्यानंतर अनेक पालकांना अश्रू अनावर झाले होते. रुग्णालयात पालकांची गर्दी जमल्याने पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाला त्यांना आवरणे कठीण जात होते. या वेळी शाळा व्यवस्थापनाकडून आलेल्या एका प्रतिनिधीकडे पालकांनी या अपघाताबाबत माहिती विचारल्यावर त्यांच्याकडून उलट उत्तरे मिळाल्याने पालकांनी त्याला घेराव घातला. सातपाटी सागरी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी बुलबुले, उपनिरीक्षक रोठे यांनी पालकांना संयम राखण्याचे आवाहन करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
बसचे चालक विष्णू पाटील ६४ वर्षांचे असून, एसटी महामंडळातून निवृत्त झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर पालकांनी रु ग्णालयाबाहेर शाळेच्या उपस्थित प्रतिनिधींना धारेवर धरले. ज्या व्यक्तीची शारीरिक क्षमता कमी झाल्यानंतर एसटी प्रशासन त्यांना निवृत्त करते. अशा चालकांना नोकरीला ठेवणाºया शाळेच्या संचालकाविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी पालकांनी या वेळी केली. त्यामुळे पोलिसांच्या तपासात हे मुद्दे पुढे येऊन बसची नोंदणी, विमा, बसची क्षमता आदी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.