कंत्राटदारांच्या हलगर्जीमुळे धुळीचे साम्राज्य; जव्हारकर हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 11:26 PM2021-02-21T23:26:18+5:302021-02-21T23:26:29+5:30
सर्दी, खोकला, श्वसनाच्या आजाराने नागरिक होत आहेत त्रस्त
जव्हार : शहराला जाणवणाऱ्या पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरोत्थान महाअभियान अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जव्हार नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे १८ कोटी रुपये निधी उपलब्ध करून तालुक्यातील खडखड या धरणातून जव्हार शहराला पाणी पुरवठा व नवीन नाळपाणी योजना कार्यान्वित करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र कंत्राटदार पाइप टाकताना रस्त्यालगत खोदून थातूरमातूर पद्धतीने कामे करत असल्याच्या तक्रारी होत आहेत.
दरम्यान, शहरभरात आता नागरिकांना कंत्राटदारांच्या हलगर्जीमुळे धूळ-मातीचा प्रचंड त्रास होत असून सर्दी-खोकला, श्वसनाच्या आजारांचा सामना करावा लागत आहे, मात्र प्रशासन मूग गिळून गप्प आहे.याबाबत नगर परिषदेने संबंधित कंत्राटदाराला सूचना देण्याखेरीज अद्याप कुठलीच कारवाई तथा दंड आकारण्यात आलेला नाही.
या योजनेत शहरासाठी नवीन पाइपलाइन, विविध ठिकाणी आरसीसीच्या लाखो लीटर क्षमतेच्या टाक्या, सोलर पंप स्टेशन, देखभाल दुरुस्ती अशा विविध बाबी समाविष्ट आहेत. सध्या कंत्राटदाराकडून नळ पाणी पुरवठा योजनेसाठी जव्हार शहरातून जमिनीखालून पाइपलाइन टाकली जात आहे. त्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने रस्ते खोदले जात आहेत.
या कामामुळे प्रचंड प्रमाणात माती रस्त्यावर पसरली आहे. मातीमधून उडणाऱ्या धुळीचे प्रमाण खूप असून, धुळीमुळे जव्हारच्या नागरिकांना सर्दी, खोकला तसेच श्वसनाचे विकार जडले आहेत. दरम्यान, एकीकडे कोरोना विषाणूची सर्दी-खोकला ही प्राथमिक लक्षणे असून धुळीमुळे सर्दी-खोकला होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. पाइप टाकायचे म्हणजे रस्ता खोदावा लागणार हे निश्चित, पण खोदलेले रस्ते थातूरमातूर बुजवले जात आहेत. त्याचा नागरिकांना होणारा त्रास, अपघात होतात त्याचे काय, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.