आदिवासींना रोजगाराची चिंता; प्रशासनाची उदासीनता मजुरांना भोवते?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 11:45 PM2019-10-08T23:45:42+5:302019-10-08T23:45:56+5:30
मागेल त्याला काम आणि १५ दिवसात दाम या तत्त्वावर रोजगार हमी योजना कार्यरत आहे.
- रवींद्र साळवे
मोखाडा : तालुक्यातील नाशेरा, आसे बोटोशी, खोच, सायदे, धामणशेत, अशा सहा ग्रामपंचायतीतील आठशेपेक्षा अधिक जॉबकार्डधारक मजुरांनी मागणी पत्रक नमुना क्रमांक ४ भरून मोखाडा पंचायत समितीकडे महिनाभरापूर्वी कामाची मागणी केली आहे. मात्र, त्यांना अद्याप काम मिळालेले नाही.
मागेल त्याला काम आणि १५ दिवसात दाम या तत्त्वावर रोजगार हमी योजना कार्यरत आहे. जॉबकार्ड मजुरांनी मागणी पत्रकातील नमुना क्र. ४ भरून दिल्यानंतर १५ दिवसात काम देणे बंधनकारक आहे. काम दिले नाही तर बेकारभत्ता देणे बंधनकारक आहे. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटूनही शेकडो मजुरांना रोजगार उपलब्ध झालेला नाही. यामुळे काम देत नसाल तर बेकारभत्ता तरी द्या, अशी संतप्त प्रतिक्रि या महेश झुगरे या मजुरांनी दिली.
रोहयो मजुरांच्या मागणीनुसार वर्षभरात रोहयो मजुरांना १०५ दिवस काम देणे शासनास बंधनकारक आहे. ‘मागेल त्याला पंधरा दिवसात रोजगार’ असे शासनाचे धोरण आहे. परंतु शासनाचा उद्देश यशस्वी होताना दिसत नाही. यामुळे येथील आदिवासी रोहयो मजुरांना स्थलांतरित व्हावे लागते. कायमस्वरूपी रोजगार मिळत नसल्याने, या आदिवासी ग्रामीण भागात भूकबळी, कुपोषण, दारिद्र्य, गरिबी अशा अनेक समस्या भेडसावत आहेत.
वास्तविक, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून रोजगार देणाऱ्या जॉबकार्ड धारक रोहयो मजुरांना ग्रामपंचायत स्तर, पंचायत समिती बांधकाम विभाग, तालुका कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, पाणलोट क्षेत्र, वनीकरण, अशा यंत्रणा आहेत.
आम्ही शेकडो मजुरांनी मागणी पत्रक क्र मांक ४ पंचायत समितीकडे महिनाभरापूर्वी भरून दिला आहे परंतु आम्हाला अद्याप काम दिले नाही
- देविदास झुगरे, सायदे
ग्रामपंचायत वंचित मजूर
आम्हाला माहिती देता येणार नाही. बीडीओंना विचारल्याशिवाय आम्हाला माहिती देण्याची परवानगी नाही.
- नामदेव पाटील, सहा. कार्यक्र म अधिकारी, रोहयो विभाग, मोखाडा
तालुक्यातील एक हजार पेक्षा अधिक मजुरांचे नमुना नं ४ आम्ही पंचायत समितीकडे भरून दिले आहेत यामधील काही मोजक्या मजुरांना रोजगार मिळाला आहे. सायदे ग्रामपंचायतीतील एकाही मजुराला रोजगार मिळालेला नाही. यामुळे रोहयो योजनेचा उद्देश बासनात गुंडाळला जातोय.
- पांडू मालक, सचिव - श्रमजीवी संघटना मोखाडा तालुका
याबाबत संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत. कामे सुरू करा दिवाळीला सर्व मजुरांना कामाचा मोबदला मिळायला हवा.
- प्रदीप वाघ, सभापती पंचायत समिती, मोखाडा
काही मजुरांना काम उपलब्ध झाले. ज्या मजुरांना काम उपलब्ध झालेले नाही त्यांनाही काम दिले जाईल.
- संगीता भांगरे, बीडीओ पंचायत समिती मोखाडा