रोजगार हमी योजनेत तीन फुलशेतींचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 10:56 PM2020-12-31T22:56:40+5:302020-12-31T22:56:47+5:30
पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील आदिवासी आणि दुर्गम भागात मोगरा आणि चाफा या फुलांची लागवड यशस्वी झाल्याचे विवेक पंडित यांच्या निदर्शनास आले होते.
जव्हार/मोखाडा : गुलाब, मोगरा व निशिगंध या फुलशेतीचा, फळबाग लागवडीप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत समावेश करण्याचा पथदर्शी निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांना रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी पत्र पाठवून माहिती दिली आहे.
पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील आदिवासी आणि दुर्गम भागात मोगरा आणि चाफा या फुलांची लागवड यशस्वी झाल्याचे विवेक पंडित यांच्या निदर्शनास आले होते. शेतकऱ्यांचा या फुलशेतीकडे वाढता कल पाहून, रोजगार हमी योजनेत फळबाग लागवडीप्रमाणे फुलशेतीचाही समावेश केला तर फुलशेती करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजूर यांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे आदिवासीच नव्हे तर बिगर आदिवासी शेतकऱ्यांनादेखील रोजगाराचा एक उत्तम पर्याय निर्माण होईल आणि रोजगार हमी योजना खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक रोजगारनिर्मितीचे साधन बनू शकेल, अशी मागणी पंडित यांनी केली होती.
फुलशेतीचा समावेश रोजगार हमी योजनेत करण्याबाबत त्यांनी वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधले होते. तीन वर्षांपूर्वी नागपूर येथे झालेल्या एका शासकीय बैठकीतदेखील याबाबत मागणी करून या बदलामुळे होणारे सकारात्मक परिणाम विशद केले होते. तसेच अनेक वेळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे तसेच सचिव, मृदू व जलसंधारण, रोजगार हमी योजना आणि आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांना सातत्याने पत्रव्यवहार करून या मागणीचा पाठपुरावा केला होता. बेरोजगारी हे कुपोषण व स्थलांतराचे एक महत्त्वाचे कारण आहे.
दुर्गम भागातील आदिवासींना रोजगार उपलब्ध करण्यासाठी ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’ची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेत योग्य ते बदल करून फुलशेतीचा समावेश रोजगार हमी योजनेत करावा, जेणेकरून फुलशेतीची लागवड मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यातून शेतकरी व शेतमजूर यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे पंडित यांनी वेळोवेळी नमूद केले होते.