इंदिरा बचत गटाने दिला रोजगार
By admin | Published: June 8, 2015 04:33 AM2015-06-08T04:33:42+5:302015-06-08T04:33:42+5:30
कृषी विभागाच्या पाणलोट प्रकल्प व येथील बचत गटाने घेतलेली मेहनत यामुळेच इंदिरा बचत गटाने अनेकांना रोजगारही मिळवून दिला.
जव्हार : आदिवासी कुटुंबांची रोजगारासाठी होणारी हेळसांड लक्षात घेऊन भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्तरीत्या राबविल्या जाणाऱ्या कृषी विभागाच्या पाणलोट प्रकल्प व येथील बचत गटाने घेतलेली मेहनत यामुळेच इंदिरा बचत गटाने अनेकांना रोजगारही मिळवून दिला.
एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम हा भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने चालविला जात आहे. आदिवासी दुर्गम भागातील पाणलोट विकासांतर्गत प्रत्यक्ष पाहणी करून त्या भागातील आदिवासी गावपाड्यांवर जाऊन एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत पाणलोट समिती स्थापन करून या समितीच्या नियंत्रणाखाली महिला तसेच पुरुषांच्या गटाची निर्मिती केली.
जव्हारमधील कृषी विभागाच्या एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमामार्फत न्याहळे खुर्द गावात महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, जव्हार यांच्या पाणलोट विकासांतर्गत न्याहळे गावामध्ये २००९-१० मध्ये पाणलोट समिती स्थापन केली. एकूण १४ सदस्य या समितीत आहेत. या सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली न्याहाळे खुर्द या गावात ८ बचत गटांची स्थापना केली. या पाणलोट विकासांतर्गत या ८ महिला बचत गटांना प्रत्येकी २५ हजार रु.चे धनादेश देण्यात आले. या बचत गटांनी रोजगारासाठी पापड उद्योगाची निवड केली. (वार्ताहर)