ग्रामीण भागात गवतविक्रीतून मिळतो रोजगार; सगळा नफा व्यापाऱ्यांच्या घशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:15 PM2019-09-11T23:15:28+5:302019-09-11T23:15:44+5:30
कामगार व जमीनमालक मात्र लाभापासून वंचित
विक्रमगड : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या गवत विक्रीच्या रूपाने रोजगार लाभला आहे. विक्रमगड तालुक्यातील खेडो-पाडी गणपती सणानंतर गवत खरेदी विक्रीचा व्यवसाय तेजीत सुरू झाला आहे.
रोजगारासाठी या भागातील मजुरांना वणवण भटकावे लागते. रोजगार नसल्याने कधी कधी मोठ्या प्रमाणात स्थलांतराचा पर्याय अनेकांना निवडावा लागतो. पावसाळ्यात खेडो-पाडी रोजगाराचा आधार असलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे काहीअंशी बंद आहेत. या पावसाळ्याच्या चार महिन्यात माळरानावर, जंगलात नैसर्गिक उगवणारे गवत विकून मजुरांना थोडा फार रोजगार उपलब्ध होतो आहे. भाद्रपद महिन्यात गौरी-गणपती आणि नंतर पुढे दसरा-दिवाळी हे सण येत असल्याने सर्वांनाच पैशांची चणचण भासत असते. या सर्व संकटांवर मात करुन सोन्याचे दिवस दाखवणारा गवताचा व्यवसाय तंगीत सापडलेल्या मजुरांसाठी मोठा आधार आहे. तालुक्यातील डोंगर-माळरानावर, जंगलात उगवणारे गवताचे भारे बांधून विकण्याचा व्यवसाय सध्या तालुक्यात विक्रमगड तालुक्यातील दादडे, केव, महासरोली, साखरा, उपराले, येथे तो सुरू झाला आहे.
तंगीच्या काळात गवतातून रोजगार
या व्यवसायात गवताच्या लहान ४ जुड्यांची १ धडी व प्रत्येक धडीला ५ ते ६ रु पये गवत कापणाºयास तर जागा मालकास ६ रूपये मिळतात. मजुरांना या गवत कापणीच्या दिवसभरातून १२० ते १५० रूपये मिळतात तर जागा असलेल्या मालकाला क्विंटल मागे केवळ ९० ते १०० रूपये मिळतात. तर तेच व्यापाऱ्यांना विक्री केल्यावर क्विंटलमागे अंदाजे ५०० ते ७०० रूपये मिळतात. त्यामुळे या व्यवसायात व्यापाºयाचाच फायदा जास्त असल्याचे शेतकºयांकडून बोलले जात आसून सध्याचा काळात गवताने भरलेले ट्रकचे ट्रक मुंबईच्या दिशेने जाताना पहावयास मिळत आहेत. खरेदी केलेल्या गवताला मुंबई, वसई, विरार, नालासोपारा, बोरिवली, भिवंडी येथील तबेल्यांमध्ये मोठी मागणी असल्याने हा व्यवसाय दिवसेंदिवस तेजीत आहे. सणाच्या दिवसात औषधोपचार व आठवडा बाजारासाठी, मुलांचा शिक्षणासाठी गवत विक्र ीचा व्यवसाय मजुरांना आधार बनला आहे.