एन्काउंटरची सीआयडी चौकशी; उच्च न्यायालयाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 10:32 PM2018-11-02T22:32:04+5:302018-11-02T22:32:27+5:30
नालासोपाऱ्यातील जोगेंद्र राणा प्रकरणात तुळिंज पोलीस कटघऱ्यात
नालासोपारा : जुलै महिन्यात नालासोपारा पूर्व येथे जोगेंद्र राणा याची तुळींज पोलीसांशी झालेल्या चकमकीत गोळ्या घालून एन्काउंटर केले होते. त्यानंतर त्याचा भाऊ सुरेंद्र उर्फ सोन्याचे राणा याने ही चकमक खोटी असल्याचे सांगत माझ्या भावाची दिवसाढवळ्या पोलिसांनी हत्या केली असल्याचा आरोप करत मूंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती याबाबत आता सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी असा आदेश मूंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले आहेत.
२३ जुलै रोजी जोगेंद्र राणा याने पालघर गुन्हे शाखेतील हेड कॉन्स्टेबल मंगेश चव्हाण व मनोज सकपाळ यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला होता. यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात राणाचा जागीच मृत्यू झाला. मात्र मृत जोगेंद्रचा भाऊ सोनु राणा याने पोलिसांनी खोट्या चकमकीत भावाची हत्या केली असल्याचा आरोप करत न्यायासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार मंगळवारी मूंबई उच्च न्यायालयाने उपलब्ध पुराव्यानुसार निरीक्षणे नोंदवून न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. उपलब्ध पुरावे व माहिती लक्षात घेता हे प्रकरण सीआयडीमार्फत हाताळले जावे, तसेच चौकशीअंती चकमक बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यास दोंन्ही पोलिसांविरोधात नवा एफआयआर दाखल करावा असे स्पष्ट निर्देश खंडपीठाने त्यात दिले आहेत.
चाकूने हल्ला केला मग कुणीच जखमी कसे नव्हते
जोगेंद्रची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. मात्र त्याने शिक्षा भोगली होती. त्याने नोकरीही शोधली होती. २३ जुलै रोजी नालासोपारा पूर्व येथे मित्रांसोबत वडापावच्या दुकानावर वडापाव खात असताना दोन्ही पोलिसांनी त्याला हटकले व पैशाची मागणी केली होती. मात्र पैसे नसल्यामुळे व पोलिसांनी धमकावल्यामुळे जोगेंद्र राणा तेथून पळून जात असताना पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र त्याने पोलिसांवर धारदार चाकूने हल्ला केल्यामुळे स्वसंरक्षणार्थ चव्हाण याने त्याच्यावर दोनदा गोळ्या झाडल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला. मात्र, या घटनेनंतर जखमी झालेल्या पोलिसाच्या अंगावर कोणतीही जखम नसणे याबाबत अँड. माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.
या घटनेनंतर त्यावेळी कार्यरत असलेले पालघर पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी गंभीर दखल घेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील १२ पोलीसांकडील पिस्तूल काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. हे खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्याचा बोलले जात होते.
सदर घटनेनंतर ३०७ च्या कलमानुसार एफआयआर दाखल करण्यात आला होता. सद्या तो विषय न्यायप्रविष्ट आहे, त्यामूळे अधिक माहिती देणे उचित होणार नाही.
-विजयकांत सागर,
अप्पर पोलिस अधीक्षक, वसई
या घटनेनंतर चौकशी करण्यात आली होती. चाकू हल्ल्यात एक पोलीस किरकोळ जखमी झाला होता. मृत जोगेंद्र सोबत असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी पुढे येऊन माहिती द्यायला हवी होती.
- गौरव सिंग, पोलीस अधिक्षक