आधारनोंदणी करार संपला : जनतेचे प्रचंड हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 05:20 AM2017-08-12T05:20:29+5:302017-08-12T05:20:29+5:30
केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या आधार नोंदणीचा करार संपल्याने, महिना भरापासून राज्यातील आधारनोंदणी केंद्रे्र बंद आहेत.यामुळे या तालुक्यातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
- हुसेन मेमन
जव्हार : केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या आधार नोंदणीचा करार संपल्याने, महिना भरापासून राज्यातील आधारनोंदणी केंद्रे्र बंद आहेत.यामुळे या तालुक्यातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
आधार नोंदणीसाठी बंगळूर येथील खाजगी कंपनीस कंत्राट देण्यात आले होते, त्यानुसार महाआॅनलाईन साठी सी.एम.एस. आणि आभा कंपनीतर्फे विद्यार्थ्यांसह नागरिकांची आधार नोंदणी केली जात होती, मात्र या कंपनीचा राज्य स्तरावरील करार संपून महिना लोटला असला तरी, नवीन करार न झाल्याने आधार नोंदणीचे काम जिल्ह्यासह राज्यभर बंद आहे. विध्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक , शेतकरी यांचे प्रचंड हाल होत आहेत. आधारकार्ड केंद्र कधी सुरू होईल याचे उत्तरच कुणी देत नाही, यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
शासनाच्या नवीन आदेशानुसार बाळाच्या जन्मापासून ते वयोवृध्दानपर्यंत आधारकार्डची शासनाने सक्ती केली आहे. आधार कार्डचा नंबर सर्वच शासकीय, बँक, शैक्षणिक या बाबींसाठी आवश्यक आहे. या तालुक्यातील जनतेला कोणत्याही लहान-मोठया बाबींसाठी जव्हार शहरात यावे लागते, परंतु आधारकार्ड केंद्र बंद असल्याने त्यांची उगीचच पायपीट होत आहे. हे केंद्र लवकरात लवकर सुरु करावे अशी जनतेची मागणी आहे.
आधारकार्ड देणारी यंत्रणा सुरळीत नसतांना आधार सक्तीचे करण्याच्या शासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे येथील आदिवासीबांधवाना खूपच त्रास सहन करावा लागतो, बँकेत खाते उघडण्यापासून तर दाखल्यापर्यंत आधार लागत आहे, त्यामुळे आधार केंद्र लवकरात लवकर सुरू करावेत. - दीपक कांगण, जव्हार