प्रसुतीच्या असह्य कळा सोसत तिने केला डोलीतून चार किलोमीटरचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 07:05 AM2022-04-23T07:05:28+5:302022-04-23T07:06:49+5:30
मोखाड्याच्या आदिवासी पाड्यांत रस्ता नाही, ॲम्ब्युलन्सचा प्रतिसाद नाही, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष...
रवींद्र साळवे -
मोखाडा : राज्याची राजधानी मुंबई, हाकेच्या अंतरावर असणारे माेखाडा. मात्र आकाशाला भिडणाऱ्या इमारतीत राहणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना माेखाड्यातल्या आदिवासींचे दु:ख कसे समजणार? परिणामी पाड्यापासून रस्ता नसल्याने असह्य कळा सुरू असतानाही पाच महिन्यांच्या गरोदर महिलेला अखेर डोलीतून चार किलाेमीटर असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागल्याची संतापजनक घटना मोखाडा तालुक्यातील मुकुंदपाड्यात घडली. यापूर्वीही अनेकवेळा गरोदर महिलांचे असे हाल झाल्याच्या बातम्या येऊनही प्रत्येक पाड्यापर्यंत साध्या रस्त्याची सोयही न केल्याने प्रशासनाची अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष आदिवासींच्या जिवाशी कसे खेळते आहे, हे वास्तव पुन्हा समोर आले.
मोखाडा तालुक्यापासून साधारण ४० किलोमीटर अंतरावर डोंगरात वसलेल्या मुकुंदपाड्यातील दुर्गा मनोहर भोये या पाच महिन्याच्या गरोदर महिलेच्या पोटात बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक असह्य वेदना सुरू झाल्या. मदत मिळावी म्हणून कुटुंबीयांनी १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन केला. काहीच प्रतिसाद मिळत नव्हता, असे नातलग नरेश भोये यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
अखेर एका बांबूला कांबळ बांधून त्याचीच डोली करून तिला रुग्णालयात नेण्याचे ठरवले. तिन्हीसांजेच्यावेळी डोंगर-दऱ्यांतून पाऊलवाटेने चार किलोमीटर चालत त्यांनी आंब्याचा पाडा गाठला. तेथून तिला आसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, पण तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तेथून तिला मोखाड्याच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. दोन दिवसांच्या उपचारानंतर तिची प्रकृती सुधारल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. हा प्रश्न एकट्या दुर्गाचा नाही. अशा घटना वारंवार घडतात, असे स्थानिकांनी सांगितले.
कधीकधी रस्त्यातच रूग्ण दगावतो...
आमच्या भागात रस्त्याची सोय नाही. रुग्णाला डोली करूनच आठ- आठ किलोमीटर अंतरावर उपचारासाठी न्यावे लागते. कधी कधी एखादा गंभीर रुग्ण रस्त्यातच प्राण सोडतो. पावसाळ्यात परिस्थिती बिकट होते. तालुक्याशी संपर्क तुटून जातो. अशावेळी हताशपणे येईल त्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, असे स्थानिक आदिवासी गणपत भोये यांनी सांगितले.
नेते निवडणुकीपुरतेच
१२८ आदिवासी लोकवस्तीच्या मुकुंदपाड्यावर सोयी-सुविधांचा अभाव आहे. पाणी नाही. जवळच्या अंतरावर आरोग्याची व्यवस्था नाही. रस्ताही नाही. निवडणुका आल्या की, मते मागण्यापुरते नेते येतात, असे गाऱ्हाणे पाड्यावरच्या लोकांनी मांडले.