गावकारभारी निवडण्यासाठी जिल्ह्यात मतदारांमध्ये उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:20 AM2021-01-16T00:20:36+5:302021-01-16T00:20:57+5:30
पालघर-वसईत ८१ टक्के मतदान : अटी-नियम पाळत लावल्या रांगा
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर/पारोळ : पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये गावचा कारभारी निवडण्यासाठी मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला. पालघर तालुक्यातील एक आणि वसई तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींसाठी एकूण ८१.४५ टक्के मतदारांनी शुक्रवारी आपला मतदानाचा हक्क बजावला. कोरोनासंदर्भातले नियम व अटींचे पालन करीत शांततेत मतदान पार पडले.
पालघर तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीसाठी ८९.३८ टक्के मतदान झाले. वसई तालुक्यातील पाली येथे ८३.१५ टक्के तर सत्पाळा येथे ७९.३३ टक्के मतदान झाले. या तीनही ग्रामपंचायतींतील मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत होते.
कोरोनाकाळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर केली होती. यात पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींचा समावेश होता. पालघरमधील सागावे आणि वसई तालुक्यात सत्पाळा व पाली या दोन ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी प्रशासन पूर्ण सज्ज होते. दरम्यान, वसईतील दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये १५ जागांसाठी मतदान घेण्यात आले. ३५ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. या दोन्ही ठिकाणी मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी उत्साह होता.
कोरोनाचा प्रादुर्भाव असताना ही निवडणूक होत असल्याने निवडणूक आयोगाने विशेष काळजी घेतली होती. मास्क असल्याने मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्राबाहेर याबाबतची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्रावर हात धुण्याची सोयही करण्यात आली हाती, तर सॅनिटायझरही ठेवण्यात आले होते. तर मतदान करताना प्रत्येक मतदारांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात आले. मतदान करताना मतदान केंद्रावर प्रथमच व्यवस्था असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणूक ही वर्षातील पहिली व यापुढे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक व वसई विरार शहर महापालिका निवडणूक यांची नांदी असल्याने सर्व राजकीय पक्षांनी आपली या निवडणुकीत बाजी लावली आहे. सत्पाळ्यात बहुजन विकास आघाडी, शिवसेना, भाजप यांच्यात लढत असून, पालीमध्ये महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडी यांच्या पुरस्कृत उमेदवारांमध्ये लढत होत आहे. या सर्व उमेदवारांच्या आशा, निराशा मतपेटीत बंद झाल्याने आता तालुक्याचे लक्ष १८ तारखेला होणाऱ्या निवडणूक निकालाकडे लागले आहे.