गाव-खेड्यापाड्यात माहेरवाशीण गौरींचे उत्साहात स्वागत; गं पोरी गवरी आली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 12:42 AM2020-08-26T00:42:22+5:302020-08-26T00:42:39+5:30

गणपतीची आई, शिवाची पत्नी आणि दक्ष राजाची कन्या गौरी घरोघरी झाली विराजमान

Enthusiastic welcome of Mahervashin Gauri in villages; | गाव-खेड्यापाड्यात माहेरवाशीण गौरींचे उत्साहात स्वागत; गं पोरी गवरी आली...

गाव-खेड्यापाड्यात माहेरवाशीण गौरींचे उत्साहात स्वागत; गं पोरी गवरी आली...

googlenewsNext

विक्रमगड : गणपतीची आई, शिवाची पत्नी आणि दक्ष राजाची कन्या असलेली गौरी आज घरोघरी विराजमान झाली. माहेरवाशिणीचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या गौरीची मंगळवारी महिलांनी मुहूर्तावर नटून-थटून पूजा केलीच, पण आजच्या गौरीनाही साजशृंगार तितक्याच उत्साहात केला. दरम्यान, तालुक्यात शहर, गाव-खेड्यापाड्यासह माहेरवाशीण गौरींचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

विक्रमगड शहरात मंगळवारी गौरी गणपती बाप्पासोबत विराजमान झाल्या आहेत. परंपरेनुसार आणि नवसाच्या म्हणून तांब्यांच्या गौरीची सर्वसाधारण: ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन गौरींची प्रतिष्ठापना घरांमध्ये केली जाते. पारंपरिक पद्धतीने फुलांच्या खंड्यांच्या गौरी बसविल्या जातात. गौरीच्या आकर्षक सोज्वळ, साजिºया छबी आणि मुखवटे भाविकांनी भक्तिभावाने घरी आणले व पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. घरात समृद्धीच्या पावलांनी ये, अशी प्रार्थना महिलांनी गौरीकडे केली. गुरुवारी २७ आॅगस्टला गणपती बाप्पांसोबत गौरीलाही निरोप दिला जाणार आहे. पण हे तीन दिवस गौरीच्या कौतुकात सगळेच रमणार आहेत.

गौरीला नैवेद्यासाठी शेपूच्या भाजीसह १६ शाकाहारी भाज्या करण्याची प्रथा आहे, तर गौरीच्या पूजेला पुरणपोळीचा नैवैद्य असतो. काही घरात परंपरेनुसार श्रावण मासांतील शाकाहारी व्रताची सांगता यामुळे होते. विक्रमगडमधील महिला परंपरेनुसार दरवर्षी गौरीचे उत्साहात स्वागत करतात.

थेट स्वयंपाकघरात अवतरते गौराई

वाडा : कोरोनाच्या सावटावर मात करीत मंगळवारी भक्तिभावाने घरोघरी गौराईचे आगमन झाले. वाडा तालुक्यात विशेष परंपरा म्हणजे थेट स्वयंपाकघरात चुलीजवळ या गौराई मातेसाठी आरास मांडली जाते. पाटावर शोभिवंत चादर अंधरून त्यावर तांदळाची रास ठेवून लक्ष्मीच्या रूपाने घरात प्रवेश केलेल्या गौराईचे स्वागत गावखेड्याच्या ग्रामीण भागात झाले.

वाडा, कुडूस या शहरी भागात माती, साडू किंवा प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गौराईमाता बसविण्यात आल्या, तर काही ठिकाणी मुखवटे तयार करून त्याचे पूजन करण्यात आले. शेतकऱ्यांनी मात्र पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याला पसंती दिली. गौरीमाता म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशीण अशी श्रद्धा ग्रामीण भागात आहे.

जंगलातील विविध वेली, गौराईच्या नावे असणारे इंदूचे, सीडीचे फूल, गाय गोमेटेची वेल, दिंडीच्या पानात हिरवी गौराई माता तयार केली जाते. या हिरव्या गौराईला मंगळसूत्र, बांगड्या, नथ आदी आभूषणे घातली जातात. घरात तांबड्या मातीचे पट्टे ओढून त्यावर तांदळाच्या पिठाने गौराईची पावले उमटवली जातात. माहेरी आलेली गौराईमाता संपूर्ण घरात आनंदाने भरल्या मनाने व प्रेमाने वास्तव्य करते. गौराई मातेसाठी अळू, भेंडी, माटाची भाजी यांचा नैवेद्य दाखविला जातो. खेड्यापाड्यात अळूचे पान, तांदळाचे पीठ, दही यापासून पातवड नावाचा पदार्थ बनवला जातो. अतिशय रुचकर असणारा हा पदार्थ वर्षातून एकदाच गौराई मातेसाठी बनवला जातो.

Web Title: Enthusiastic welcome of Mahervashin Gauri in villages;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.