जिंदालच्या प्रवेशद्वारासमोर बंदराची प्रतिकृती जाळली
By admin | Published: October 7, 2015 11:55 PM2015-10-07T23:55:48+5:302015-10-07T23:55:48+5:30
नांदगाव-आलेवाडी येथे होऊ घातलेल्या जिंदाल (जेएसडब्ल्यू) स्टीलच्या बंदराविरोधात बुधवारी शिवसेनेतर्फे तारापूर एमआयडीसीमध्ये निषेध मोर्चाचे आयोजन करून जिंदाल स्टीलच्या
बोईसर : नांदगाव-आलेवाडी येथे होऊ घातलेल्या जिंदाल (जेएसडब्ल्यू) स्टीलच्या बंदराविरोधात बुधवारी शिवसेनेतर्फे तारापूर एमआयडीसीमध्ये निषेध मोर्चाचे आयोजन करून जिंदाल स्टीलच्या प्रवेशद्वारावर या बंदराची प्रतिकृती जाळून श्राद्धही घातले.
भूमिपुत्र, मच्छीमार, शेतकरी यांना उद्ध्वस्त करणाऱ्या जिंदाल बंदराला शिवसेनेचा ठाम विरोध असून बंदर उभारण्यासाठी एक वीटही लावू न देण्याचा निर्धार निषेध मोर्चासमोर शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांनी व्यक्त केला. माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ यांनी समुद्र आमची मातृभूमी आहे. तिचे रक्षण करण्यासाठी शिवसेना तत्पर असून बंदरासाठी आतापर्यंत दिलेल्या जमिनी परत घेण्याची मागणी केली. सेना नेते केतन पाटील यांनी शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला तर तालुकाप्रमुख सुधीर तामोरे यांनी स्थानिकांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहून कुठल्याही परिस्थितीत बंदर होऊ देणारच नसल्याचे सांगितले.
या निषेध मोर्चामध्ये पालघर जि.प. उपसभापती सचिन पाटील, पंचायत समितीचे सभापती रवींद्र पागधरे, उपसभापती सुशील चुरी, बोईसर व सालवड उपसरपंच नीलम संखे व गिरीश राऊत, देवा मेहेर, राजू कुटे, अजित राणे, युवा सेनेच्या दीक्षा संखे, मोहन राणे, व नांदगाव शाखाप्रमुख धर्मेंद्र पाटील, आलेवाडी शाखाप्रमुख निलेश पाटील, विभागप्रमुख राजेंद्र वाडीकर व शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)