पर्यावरण समितीचे बेमुदत उपोषण सुरू; पाणथळ जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 02:41 AM2019-12-03T02:41:46+5:302019-12-03T02:41:58+5:30
सोमवारी सकाळी १० वाजता वसई तहसीलदार कार्यालयाबाहेर महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
वसई : वसई तालुक्यातील विविध भागातील सरकारी तसेच पाणथळ जागेवर अनधिकृत उभी राहिलेली अतिक्र मणे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाकडून हटवण्यात यावीत, या मागणीसाठी पर्यावरण संवर्धन समितीच्या बेमुदत उपोषणास सोमवार, २ डिसेंबरपासून सुरुवात झाली. जोपर्यंत ही अतिक्रमणे काढण्यात येत नाहीत, तोवर हे उपोषण सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्ते मॅकेनजी डाबरे, मॅक्सवेल रोझ आणि समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी दिली आहे.
सोमवारी सकाळी १० वाजता वसई तहसीलदार कार्यालयाबाहेर महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यावर पर्यावरण समितीच्यावतीने वसई प्रांतांधिकारी स्वप्नील तांगडे आणि वसई तहसीलदार किरण सुरवसे यांना या गंभीर विषयाची आठवण करून देण्यात आली होती. गेल्या आठवड्यातच समितीने वसई प्रांतांना समक्ष भेटून आपण सरकारी जमिनी आणि पाणथळ जागेवरील प्रकल्प, बेकायदेशीर अतिक्रमणे, त्यावर झालेली बांधकामे यावर काही ठोस कारवाई करणार का, अन्यथा पर्यावरण समिती २ डिसेंबरपासून आमरण उपोषणाला बसेल, असा लेखी इशारा दिला होता.
त्यावेळी वसई प्रांतांनी लागलीच संबधित महसूल, पोलीस, महावितरण आणि खास करून नियोजन प्राधिकरण म्हणून वसई - विरार महापालिका यांना बैठकीला बोलावून त्यांना याबाबत नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले होते तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कारवाईची जबाबदारी महापालिकेची असल्याचे स्पष्ट केले होते.
मात्र, महसूल व महापालिका प्रशासन विभागाने गेला महिनाभर केवळ आंधळी कोशिंबिरीचा खेळ मांडून याबाबत काहीही कारवाई केली नाही. अखेर सोमवारी वसई पर्यावरण समितीने आपल्या आंदोलनास सुरुवात केली. कोळी युवा शक्ती, वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्था पाचूबंदर तसेच वनशक्ती संघटना आदिवासी एकता परिषद अशा तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अनेक संघटना, संस्था आणि त्यांचे शेकडो पदाधिकारी तसचे हजारो कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थळी भेट देत आपला जाहीर पाठिंबा दिल्याचे वर्तक यांनी लोकमतला सांगितले.
या आंदोलनसंदर्भात दुपारी वसई प्रांत कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले होते. मात्र प्रांतांचा संपर्क न होऊ शकल्याने याबाबत काहीही माहिती मिळाली नाही.
फा. दिब्रिटो यांचा पाठिंबा
हरित वसईचे प्रणेते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तसेच या आंदोलनालाही त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे आमच्या या आंदोलनाला अधिक बळ मिळत असल्याची प्रतिक्रि या यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिली. कोळी युवा शक्ती, वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्था पाचूबंदर तसेच वनशक्ती संघटना आदिवासी एकता परिषद अशा अनेक संघटना, संस्थांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.