भाईंदर रेल्वे स्थानकावरील सरकत्या जिन्याची फ्रेम बसली; लवकरच सुरु होणार सरकता जिना
By धीरज परब | Updated: April 24, 2024 19:34 IST2024-04-24T19:31:23+5:302024-04-24T19:34:22+5:30
बालाजी नगर येथील रस्त्याचे काँक्रीटीकरणचे काम सुरु आहे.

भाईंदर रेल्वे स्थानकावरील सरकत्या जिन्याची फ्रेम बसली; लवकरच सुरु होणार सरकता जिना
मीरारोड: भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस बालाजी नगर येथील रस्त्याचे काम रखडल्याने रेल्वे स्थानकात जाण्यासाठी सरकत्या जिन्याची फ्रेम बसवण्याचे काम बारगळल्याचे वृत्त 'लोकमत'ने दिल्या नंतर पालिका आणि रेल्वे प्रशासनाने समन्व्य साधून सरकत्या जिन्याची फ्रेम लावण्याचे काम करण्यात आले आहे. फ्रेम बसल्याने आता उर्वरित कामे लवकरच पूर्ण होऊन सरकत जिना प्रवाश्यांच्या सुविधेसाठी खुला होणार आहे.
बालाजी नगर येथील रस्त्याचे काँक्रीटीकरणचे काम सुरु आहे. कामादरम्यान जलवाहिनी तुटण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे पाणी प्रश्न निर्माण झाला. तर मुख्य जलवाहिनी, नळजोडणी, वीज केबल आदी कडेला हलवण्याच्या कामात सुद्धा वेळ लागला. त्यामुळेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु झालेले रस्ता काँक्रीटीकरणचे काम अजून निम्मे सुद्धा झालेले नाही.
दुसरीकडे भाईंदर रेल्वे स्थानकात ये-जा करण्यासाठी बालाजी नगर पोलीस चौकी येथील पादचारी पूल रेल्वेने तोडून टाकला. त्यामुळे प्रवाश्याना अरुंद बोळातून मधल्या पुला द्वारे ये-जा करावी लागते. रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा नमुना म्हणजे बालाजी नगर येथे नवीन पादचारी पूल बांधला मात्र त्याचे जिने उत्तरे कडे मधल्या पुलाच्या दिशेने उतरवल्याने प्रवाश्याना रोजचा त्रास सहन करावा लागतोय.
प्रवाश्याना अरुंद बोळातून मार्ग काढणे आणि वळसा घालून पादचारी पुलाचा वापर करावा लागत असल्याने ते आधीच संतप्त आहेत. खासदार राजन विचारे यांनी प्रवाश्यांची गैरसोय पाहून बालाजी नगरच्या तोडलेल्या जुन्या रेल्वे पुलाच्या जागी सरकता जिना बसवण्याची मागणी करत काम मंजूर करून घेतले. सरकत जिना बसवण्यासाठी त्याचा काँक्रीटचा पाया पण बांधून झाला. परंतु पालिकेचे रस्त्याचे काम रखडल्याने जिन्याची फ्रेम आणणे अशक्य होऊन काम लांबणीवर पडले.
फ्रेम आणून बसवण्याच्या अवघ्या काही तासाच्या या कामासाठी अनेक दिवस वा महिने लागण्याची शक्यता पाहता लोकमत ने या बाबतचे वृत्त दिले. मंगळवारीच खा. विचारे यांच्या मध्यस्थीने रेल्वे प्रशासनाने पालिका प्रशासनाने समन्वय साधून जिन्याची फ्रेम नेण्याची व्यवस्था करण्यात आली. फ्रेम आणून ती सरकता जिन्याच्या ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने बसवण्यात आली. खाली जमिनी पासून ती नवीन पादचारी पुलाला फ्रेम जोडण्यात आली आहे. भली मोठी हि फ्रेम बसवण्यात आल्याने आता सरकत्या जिन्याचे उर्वरित काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .
लवकरच सरकत्या जाण्याचे काम पूर्ण होऊन तो प्रवाश्यांसाठी खुला केला जाणार आहे. यामुळे निदान भाईंदर स्थानकात जाण्यासाठी तरी सरकत्या जिन्याचा मोठा उपयोग होऊन प्रवाश्याना अरुंद बोळातून मधल्या पुलाकडे जाण्याची पाळी येणार नाही . शिवाय सरकता जिना झाल्याने सामान्य प्रवाश्यांसह वृद्ध , दिव्यांग , रुग्ण लहान बाळ ना घेऊन जाणारी महिला वा गरोदर महिला आदींना सुद्धा दिलासा मिळणार आहे.