मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करूनही परिस्थिती जैसे थे! दोन जागांचे अधिग्रहण रखडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 12:36 AM2019-05-06T00:36:37+5:302019-05-06T00:36:56+5:30
जव्हार तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाडा येथे आजही जाण्यासाठी रस्ता नसून याबाबत २०१७ साली मुख्यमंत्र्यांकडे तक्र ार करूनही आजही परिस्थिती जैसे थेच आहे.
जव्हार - जव्हार तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाडा येथे आजही जाण्यासाठी रस्ता नसून याबाबत २०१७ साली मुख्यमंत्र्यांकडे तक्र ार करूनही आजही परिस्थिती जैसे थेच आहे. यामुळे ग्रामस्थनी खूप पाठपुरावा करून पंचायत समितीद्वारे आवश्यक भूखंड अधिग्रहण करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत सादर केला आहे.
फक्त पायवाटच असलेल्या रस्त्यामुळे खेडोपाड्यातील लोकांना खूपच त्रास सहन करावा लागत असून याबाबत गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासनाकडे तसेच लोकप्रतीनिधीमध्ये जेवढे प्रकार असतील अशा सर्वांकडे तक्र ार करून तसेच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे लेखी निवेदन २०१७ साली दिले होते.
गावात जाण्यासाठीचा रस्ता करण्यामध्ये दोन खाजगी जागा येत असल्यामुळे हा प्रस्ताव रेंगळून पडला होता, मात्र आता गटविकास अधिकारी शेखर रौंदळ यांच्या प्रयत्नाने वालवंडा ग्रामपंचायतीने ठराव करुन दि. ०५/०४/२०१९ रोजी तहसीलदार कार्यालयात सार्वजनिक रास्ता तयार करण्यासाठी खाजगी जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून लवकरात लवकर त्यास परवानगी मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यामध्ये रास्ता तयार करण्यासाठी परशुराम केवजी भोये यांची ९० मीटर तर शशिकला दत्तात्रेय विश्वासराव यांच्या मालकीची ४१५ मीटर जागा अधिग्रहण करण्यात येणार आहे.
खडकीपाडाची लोकसंख्या १७५ असून जव्हार ते ठाणे रोडवर जव्हारहून १० कि.मी. अंतरावर असलेल्या वाळवंडा गावापासून चौक गावाच्या वाढूपाडा पूला पर्यत डांबरी रस्ता आहे, तेथून दिड कि.मी. अंतरावर खडकीपाडा गाव आहे. परंतु गावात जाण्यासाठी स्वातंत्र्यकाळापासून आजतागायत जाण्याचा रस्ताच नाही, पावसाळ्यात तर मोठी तारांबळच उडत असून पावसात या पुलावर पाणी भरून वाहतो, त्यामुळे गावाचा संपर्कही तुटतो, परिणामी शेतातून पायवाट करीत घरापर्यत जावे लागते. रस्ता नसल्यामुळे रूग्णांचे तर खूपच हाल होतात, त्यांना डोली करून दिड कि.मी. अंतरावर पायी चालून रस्त्यावर न्यावे लागते, पावसाळ्यात तर तेही करता येत नाही त्यामुळे कित्येक रूग्णांचे रस्ते अभावी जीव गमवावा लागला आहे.
फळ्यांचा पूल लागतो ओलांडावा
गावाच्या बाजूस नदीच्या पलीकडे इ. १ ली ते ४ थी पर्यतची शाळा असुन त्यामध्ये गावातील ४० ते ४५ विद्यार्थी शिक्षण घेत असून नदीवर दोन लाकडी फळ्या टाकून त्यावरून बालवाडी ते ४ थी पर्यतचे विद्यार्थी मोठी सर्कस करीत जीव धोक्यात टाकून रोज ये जा करतात अशी भयानक परीस्थीत गाव असून कोणी देत का लक्ष रे बाबा आमच्या गावाकडे अशी संतप्त प्रतिक्रि या जनता करीत आहे.