कोरोना प्रादुर्भावाच्या काळात लिंबाने खाल्ला भलताच भाव - एका नगाला चक्क १० रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 11:52 PM2021-04-22T23:52:43+5:302021-04-22T23:52:54+5:30
कडक उन्हाळा वाढू लागल्यामुळे सरबतासाठीही लिंबांची मागणी वाढली आहे. त्यामुळे उत्तम प्रतीच्या लिंबांचा भाव सध्या बाजारात अक्षरशः प्रतिनग १० रुपयांवर गेला आहे.
आशिष राणे
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : कोरोना संक्रमणकाळात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन म्हणून भाज्या, गोळ्या आणि खासकरून 'क' जीवनसत्त्व पदार्थांचे सेवन करण्याचा वैद्यकीय सल्ला सर्वांनाच दिला जात आहे. दुसरीकडे आजीबाईचा बटवा वाचला, तर रोगाचा प्रादुर्भाव होतो तेव्हा किंवा कडक उन्हाळ्यात 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात लागते. त्यामुळे ‘क’ जीवनसत्त्व असलेल्या लिंबांचे सेवन करण्याकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला असून मागणी वाढल्याने लिंबांच्या भावातही वाढ होऊन वसईत आता एका नगाला १० रुपये मोजावे लागत आहेत.
कडक उन्हाळा वाढू लागल्यामुळे सरबतासाठीही लिंबांची मागणी वाढली आहे. त्यामुळे उत्तम प्रतीच्या लिंबांचा भाव सध्या बाजारात अक्षरशः प्रतिनग १० रुपयांवर गेला आहे. मागील महिन्याच्या अखेरीस ही लिंबं १० रुपयांना चार-पाच मिळायची. मात्र, आता ते दिवस गेले, असे ग्राहक म्हणतात. एकीकडे मागणी वाढली असताना कमी उत्पादनामुळे लिंबांची आवक घटल्याने लिंबांच्या किमतीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे
म्हणणे आहे.
वसईत किंवा पालघर जिल्ह्यात कुठेही लिंबांची शेती नाही. त्यामुळे जवळील ठाणे, मुंबई, नवी मुंबई तसेच इतर जिल्ह्यांतील सोलापूर, अहमदनगर, बीड तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून लिंबांची आवक होत असते. उन्हाळ्याच्या काळात लिंबांची मागणी वाढते, मात्र आवक तुलनेने कमी प्रमाणात होत असते. दुसरीकडे कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून अनेक जण काळजी घेत असून त्याचबरोबर दैनंदिन आहाराकडेही लक्ष देत आहेत. त्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नागरिक 'क' जीवनसत्त्व असलेल्या लिंबांचा वापर करू लागले आहेत. आधीच उन्हाळ्यात लिंबांची मागणी वाढली असतानाच कोरोनाकाळामुळे लिंबांना मोठी मागणी येऊ
लागली आहे.
आवक झाली कमी
वसई तालुक्यांतील बाजारांत सध्या लिंबांची आवक खूपच कमी झाली आहे, मात्र त्याच वेळी मागणीत मोठी वाढ झाली आहे. ही तफावत होऊ लागल्याने लिंबांचे दर प्रतिनग १० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, अशी माहिती माणिकपूर येथील अशोक पांडे व दत्ता पाटील या विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला दिली.