वाड्यात यंदाही गणरायांचे आगमन होणार खड्ड्यांतूनच; भक्तांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 01:42 AM2019-08-23T01:42:21+5:302019-08-23T01:42:40+5:30
वाडा शहराचे क्षेत्रफळ अवघे सहा चौरस किमी. असून शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची लांबी २५ ते २६ किमी. आहे.
वाडा : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता काहीच दिवस राहिले आहेत. यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र वाडा शहरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना व घरगुती गणपतीची स्थापना करणाऱ्यांना चिंता लागली आहे ती वाडा शहरातील खड्डेमय रस्त्यांची. गेल्यावर्षीही येथील रस्त्यांची हीच अवस्था होती. यंदाही ती तशीच आहे. गेल्या वर्षभरात येथील लोकप्रतिनिधी आणि स्वत:ला राजकीय पुढारी समजणा-या कार्यकर्त्यांनी काहीच न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून ‘गणपती बाप्पा, आता तरी या सर्वांना सुबुद्धी दे’, असे म्हणण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.
वाडा शहराचे क्षेत्रफळ अवघे सहा चौरस किमी. असून शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची लांबी २५ ते २६ किमी. आहे. येथील मुख्य रस्त्यासह अनेक रस्त्यांची दुरुस्ती अनेक वर्षांपासून झाली नसल्याने या रस्त्यांची अवस्था खूपच दयनीय झाली आहे. वाडा शहरातील निम्म्या रस्त्यांनी रस्त्यांनी अजून डांबर बघितलेले नाही. तर काही रस्ते अजून खडीच्या प्रतिक्षेत आहेत. येथील रस्त्यावरील खड्डे चुकविताना दुचाकीस्वारांचे वारंवार अपघात होत आहेत तर अन्य वाहन चालकांना मोठी कसरत करुन गाडी चालवावी लागते आहे.
गतवर्षी बाप्पाचे आगमन खड्डेमय रस्त्यातूनच झाले होते. वर्षभरात येथील प्रमुख अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी केली होती. मात्र या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे कुठल्या लोकप्रतिनिधींनी अथवा पुढाऱ्यांनी ढुंकूनही बघितलेले नाही.
शहरातील शिवाजी नगर, शास्त्री नगर, विवेकनगर येथील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. येथील सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. यातूनच गणपतीचे आगमन होणार असल्याने गणेश भक्तांमध्ये नाराजी आहे.
या संदर्भात फोनवरून मी प्रतिक्रि या देऊ शकत नाही. त्यासाठी कार्यालयात येऊन प्रत्यक्ष भेटा तेव्हाच माहिती मिळेल.
- दशरथ मुरूडकर, प्रभारी, उपअभियंता पंचायत समिती बांधकाम विभाग
बांधकाम विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा करून लवकरच खड्डे भरण्याचा प्रयत्न करू.
- अश्विनी शेळके,
सभापती, पंचायत समिती,