अखेर कर्मचाऱ्यांना थकीत पगार मिळाले; पाच महिन्यांपासून थकला पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:45 AM2020-02-08T00:45:26+5:302020-02-08T00:45:44+5:30
बीएआरसी अंतर्गत काही बांधकाम सुरू असून त्याचा ठेका हिंदुस्तान कंपनीला देण्यात आला आहे.
पालघर : तारापूरच्या बीएआरसी (आयपी) साईटवर बांधकामाचा ठेका दिलेल्या हिंदुस्तान कंपनी लिमिटेड या कंपनीने पाच महिन्यांपासून थकवलेला १ हजार ३४४ कामगारांचा पगार शुक्रवारपर्यंत देण्याचे आदेश कामगार उपायुक्त किशोर दहिफळकर यांनी कंपनी प्रशासनाला दिले होते. त्याप्रमाणे शुक्रवारी हा पगार कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आला. पगार न मिळाल्याने कर्मचाºयांचे आर्थिक गणित कोलमडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्याची दखल घेत हे आदेश देण्यात आले आहेत.
बीएआरसी अंतर्गत काही बांधकाम सुरू असून त्याचा ठेका हिंदुस्तान कंपनीला देण्यात आला आहे. येथे एकूण एक हजार ३४४ कामगार काम करीत असून त्यातील अनेक कामगार हे स्थानिक घिवली, तारापूर उच्छळी-दांडी पोफपरण येथील आहेत. एकूण कामगारांपैकी १३४ कार्यालयीन कर्मचारी, १००० कर्मचारी अन्य राज्यातील तर अवघे २१० स्थानिक आहेत. यातील अनेक कामगारांना आॅगस्ट २०१९ पर्यंतचे वेतन मिळाले असून सप्टेंबरपासून आजतागायत थकित पगार दिला नसल्याची तक्रार स्थानिक कामगारांनी जिल्हाधिकारी डॉ. शिंदे आणि कामगार उपायुक्त किशोर दहिफळकर यांच्याकडे केली होती.
याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर कामगार सहआयुक्त दहिफळकर यांनी तीन फेब्रुवारी रोजी आपल्या दालनात हिंदुस्थान कंपनीचे प्रतिनिधी संजय गोरे, स्थानिक ठेकेदार, कामगार यांची बैठक आयोजित केली होती. या असंघटित कामगारांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असून हा ठेकेदार वर्ग स्थानिक असतानाही त्यांच्याकडूनच त्रास होत असल्याची तक्रार स्थानिक कर्मचाºयांनी ह्या बैठकीत केली.
कामगार २०१६ पासून बीएआरसीने दिलेल्या ठेकेदारांच्या बांधकामावर काम करीत असून त्यांना नियमानुसार किमान वेतन दिले जात नाही. तसेच त्यांना भविष्य निर्वाह निधीही दिला जात नसून दिवाळीचा बोनसही आम्हाला मिळाला नसल्याच्या तक्रारीवर सहआयुक्त दहिफळकर ह्यांनी बोनसबाबतही कंपनीने लवकर निर्णय घ्यावा असे आदेश दिले.तर कार्यालयीन कर्मचाºयांचा नोव्हेंबर ते जानेवारी, स्थानिकांचा २ महिन्यांचा पगार बाकी असल्याचे सांगण्यात आल्यानंतर हे पगार ७ फेब्रुवारी पर्यंत देण्याचे आदेश कंपनी व्यवस्थापनाला देऊन तसे आपल्याला कळविण्यास सांगितले.
स्टाफचा नोव्हेंबर महिन्याचा तर कर्मचाºयांचा डिसेंबर महिन्याच्या पगाराचे पैसे आज अदा केले आहेत. तर १० फेब्रुवारी रोजी होणाºया बैठकीत सर्व कामगारांचे पगार देण्यावर माझा भर असेल.
- किशोर दहिफळकर, सहआयुक्त कामगार