दररोज शेकडो लीटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:23 PM2019-12-19T23:23:27+5:302019-12-19T23:24:03+5:30
आॅलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावाला गळती : ठेकेदारासह प्रशासनाचे दुर्लक्ष
आशिष राणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसई-विरार शहर महापालिकेच्या ‘एच’ प्रभागाअंतर्गत नवघर-माणिकपूर शहरातील आॅलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावातून काही दिवसांपासून पाणी गळती होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मात्र, या तलावावर नियंत्रण ठेवणारे ठेकेदार, व्यवस्थापक तथा पालिकेतील अधिकारी वर्गही याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे या गळतीमुळे इथे दररोज शेकडो ली. पाणी वाहून वाया जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
वसई - विरार महापालिका नवघर - माणिकपूर विभागीय ‘एच’ प्रभागांतर्गत ओमनगर परिसरात पालिकेतर्फे २५ बाय १५ मीटर हा सेमी आॅलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव बांधण्यात आला आहे. येथे सकाळी तसेच संध्याकाळी मुले - मुली, तरुण पोहण्यासाठी येतात. दरम्यान, मधल्या काळात एप्रिल महिन्यात या तलावात बुडून एक आठ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला.
तेव्हापासून हा तलाव बरेच महिने पोहण्यासाठी बंद करण्यात आला होता. आता दोनच महिन्यांपूर्वीच पोहण्यासाठी हा तलाव पुन्हा खुला करण्यात आला आहे.
मात्र, दरम्यानच्या काळात या तलावाच्या देखभाल - दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने तलावाला गळती लागून यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे येथे पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सांगितले. त्यामुळे ज्या ठिकाणी तलावाला गळती लागली आहे, त्या भागाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी येथील व्यवस्थापकांकडे केली होती. तरीही याची दुरुस्ती न झाल्याचा आरोप राज दसोनी यांनी केला असून दुरुस्तीअभावी अद्यापही पुलामधून दररोज शेकडो ली. पाणी वाया जात आहे.
याबाबतची माहिती पालिका अधिकाऱ्यांना देखील देण्यात आली आहे. तसेच, या तलावासाठी पालिका लाखो रुपयांचा खर्च करत असूनही या तलावाची योग्य ती निगा राखली जात नाही. हा करदात्यांच्या पैशाचा अपव्यय असून पालिकेने त्वरित ही गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
नेमकी गळती कुठून होते?
प्रशासकीय पातळीवर हा विषय बांधकाम खात्याकडे येतो. मात्र, बांधकाम खाते पाणी विभागाकडे बोट करते. त्यांना तपासणी करायला लावते. पाणी खात्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी जलतरण तलावाला जोडलेल्या पालिकेच्या जलवाहिन्या तसेच त्यांचे फिल्टर तपासले असून नेमकी गळती कुठून होत आहे हेच समोर येत नाही. त्यामुळे बांधकाम खाते आणि ज्यांनी कोणी त्या वेळी काम केले आहे, त्यांनी योग्यरीत्या तपास करणे महत्त्वाचे असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला मिळाली आहे.
मला या प्रकाराची माहिती आताच मिळत असून आपण सांगता आहात त्याप्रमाणे दररोज हजारो ली. पाणी वाया जात असेल तर ही बाब गंभीर आहे. मी ताबडतोब या जलतरण तलाव गळतीच्या प्रकरणात जातीने लक्ष टाकून ते काम करून घेतो.
- प्रवीण शेट्टी, महापौर, वसई - विरार शहर महानगरपालिका
माझ्याकडे याबाबत दोन - तीन तक्रारी आल्या असून पाणी विभागाच्या कर्मचाºयांकडून लवकरच याची पाहणी करतो. ज्यांनी हे काम केले आहे, त्यांनाही बोलावून घेतो.
- प्रकाश साटम, बांधकाम उपअभियंता, एच प्रभाग समिती