प्रत्येकाचीच लढण्याची इच्छा, पण उमेदवार मिळता मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 09:47 AM2023-06-13T09:47:14+5:302023-06-13T09:47:22+5:30

शिवसेना, भाजप, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रस्सीखेच

Everyone wants to fight, but can't get a candidate Palghar Constituency | प्रत्येकाचीच लढण्याची इच्छा, पण उमेदवार मिळता मिळेना!

प्रत्येकाचीच लढण्याची इच्छा, पण उमेदवार मिळता मिळेना!

googlenewsNext

जगदीश भोवड, लोकमत न्यूज नेटवर्क, वसई: ठाणे आणि कल्याण मतदारसंघ हा आमचा गड असल्याचे सांगत त्यावर भाजपने दावा केलेला असतानाच आता पालघर लोकसभा मतदारसंघावरूनही युतीतील शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. त्यावेळी महाविकास आघाडीत शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही या मतदारसंघावरून स्पर्धा आहे. त्यातच बहुजन विकास आघाडी रिंगणात असल्याने येथील लढत  उत्सुकता वाढवणारी ठरेल.

पालघरचे प्रतिनिधित्व  शिवसेनेचे राजेंद्र गावित करत आहेत. पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा असला, तरी या लोकसभा मतदारसंघात वसई, विरार व नालासोपारा या शहरी भागांचाही समावेश आहे. तेथे बहुजन विकास आघाडीचा वरचष्मा आहे. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी डहाणू माकपकडे, विक्रमगड राष्ट्रवादीकडे, पालघर शिवसेनेकडे; तर बोईसर, नालासोपारा आणि वसई हे मतदारसंघ बहुजन विकास आघाडीकडे आहेत. मात्र, येथील खासदार शिवसेनेचा आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित हे ८८ हजार मतांनी विजयी झाले होते. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा पराभव केला होता.

सत्तांतर व शिवसेनेतील फुटीनंतर  गावित शिवसेनेच्या शिंदे गटात गेले. त्यामुळे त्या पक्षाकडून तेच पुन्हा रिंगणात असतील.  भाजपच्या नेत्यांनीही मागील निवडणुकीतील चिंतामण वनगा यांच्या विजयाचा दाखला देत या मतदारसंघावर दावा सांगायला सुरुवात केली आहे. त्यासाठी सध्याच्या खासदारांचा संदर्भ देत व  ताकदीचा अंदाज घेत भाजपने अंतर्गत सर्वेक्षण पूर्ण केल्याने युतीत हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो, उमेदवारी कोणाला मिळते यावरच सारे चित्र आहे. बविआचे बळीराम जाधव उमेदवार असू शकतात. युती व महाविकास आघाडीची लढत झाली, तर मतविभागणीवर बविआचे लक्ष असेल.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादीने या मतदारसंघावर दावा केला आहे व स्थानिक स्वराज्य संस्थांतील यश, विक्रमगडची आमदारकी यांचा दाखला दिला आहे, तर शिवसेनेने सद्यस्थितीनुसार हा मतदारसंघ आमचाच असल्याचा दावा केलाय. राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांच्या नावाची चर्चा आहे.

ठाकरे गटाकडून कोण?

शिवसेनेच्या ठाकरे गटाला हा मतदारसंघ स्वत:कडेच हवा असला, तरी उमेदवार कोण, हा प्रश्नच आहे. सध्या तरी ठाकरे गटाकडून कुणाचेही नाव चर्चेत नाही.

पूर्वी काँग्रेसचे वर्चस्व

१ ऑगस्ट २०१४ रोजी  पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. पूर्वी येथे काँग्रेसचे वर्चस्व होते. काँग्रेसचे दामू शिंगडा हे पाचवेळा खासदार होते. मात्र, २००९ मध्ये या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी अनपेक्षितपणे विजय मिळविला. त्यानंतर मात्र काँग्रेसला संधी मिळाली नाही.

गावितांना दोन वेळा संधी 

२०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर चिंतामण वनगा खासदार म्हणून निवडून गेले होते. मात्र, २०१८ मध्ये त्यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात काँग्रेसमधून येऊन भाजपच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या राजेंद्र गावितांचा विजय झाला होता. या निवडणुकीत चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांनी पक्षात दुर्लक्ष होत असल्याचे कारण देत बंडखोरी करत शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला आणि गावित विजयी झाले. नंतर २०१९च्या निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला, पण भाजपने राजेंद्र गावित हा आपला उमेदवार शिवसेनेला दिला. तेव्हा ते विजयी झाले. मात्र, अवघ्या दोन वर्षांत त्यांनी तीन पक्षांचे प्रतिनिधित्व केले.

मतांचे गणित होते कसे? 

२०१९च्या निवडणुकीत राजेंद्र गावित यांनी शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली आणि ५,८०,४७९ मते मिळवली. तेव्हा बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना ४,९१,५९६ मते मिळाली. त्यापूर्वी २०१८ ला भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर  पोटनिवडणूक झाली. तेव्हा वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांनी बंडखोरी करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे भाजपने काँग्रेसमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. त्यांना २,७२,७८२ मते मिळाली, तर  श्रीनिवास वनगा यांना २,४३,२१० मते मिळाली. त्या आधीच्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे  चिंतामण वनगा हे युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यांना ५,३३,२०१ मते मिळाली, तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना  २,९३,६८१ मते मिळाली.

Web Title: Everyone wants to fight, but can't get a candidate Palghar Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर