तलासरी तालुक्यातील आश्रमशाळांमध्ये परीक्षा?;शिक्षकांना उपस्थिती सक्तीची, नाराजीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 12:07 AM2020-11-09T00:07:12+5:302020-11-09T00:07:24+5:30
तलासरी या आदिवासी भागात ऑनलाइन अभ्यास घेणे कठीण आहे.
तलासरी : काेरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी मुलांच्या घरी जाऊन त्यांचा अभ्यास घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेण्यात येऊ नयेत, असे शासनाने निर्देश दिले आहेत. मात्र, तलासरी तालुक्यातील आश्रमशाळांच्या मुलांच्या परीक्षा घेण्याचे आदेश डहाणू प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिल्याने तसेच शाळांमध्ये दररोज येण्याचे बंधनकारक केल्याने शिक्षकांतून नाराजी व्यक्त
होत आहे.
तलासरी या आदिवासी भागात ऑनलाइन अभ्यास घेणे कठीण आहे. नेटवर्कचा प्रॉब्लेम, मुलांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती यामुळे बहुतांश मुलांकडे स्मार्ट फोन नाहीत. त्यामुळे शिक्षकांना मुलांना शिकवणे कठीण झाले आहे. तसेच, मुलांना पुस्तकेही दिली नसल्याने मुले परीक्षा कशी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आश्रमशाळांच्या शिक्षकांना दररोज शाळांमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ५ येऊन नंतर गावपाड्यात जाऊन तेथून लोकेशन दाखवणे सक्तीचे केले आहे. ऑनलाइन शिक्षण देणे बंधनकारक असताना शिक्षकांना शाळांमध्ये बाेलावले जात असल्याने त्यांच्यातून नाराजी व्यक्त हाेत आहे.
परीक्षा नव्हे, वर्कशीट साेडवण्याचे आदेश
प्रकल्प कार्यालयाकडून कोणत्याही परीक्षा घेण्याचे नियोजन नाही. १५ जूनपासून मुलांचा ऑनलाइन अभ्यास घेणे, तसेच घराेघरी जाऊन त्यांना शिकवण्याचे निर्देश दिले असल्याचे प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले. काही शिक्षक याबाबत टाळाटाळ हाेत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मुलांना सराव असावा म्हणून त्यांना वर्कशीट देऊन त्या सोडवून घेण्यास सांगण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेण्यात येत नसल्याचे मित्तल म्हणाल्या.