वाढवण बंदराच्या मुद्द्यावरून मतदानावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:35 PM2019-10-14T23:35:13+5:302019-10-14T23:35:25+5:30
धाकटी डहाणू, केळवेवासीयांचा निर्णय : जिल्हाधिकाऱ्यांची शिष्टाई झाली असफल
- हितेन नाईक/शौकत शेख
पालघर : वाढवण बंदराविरोधातील धगधगता वणवा आता किनारपट्टीवरील विधानसभा मतदार संघात भडकू लागला आहे. याविरु द्ध स्थानिकांमध्ये प्रचंड रोष असून हे बंदर रद्द करावे यासाठी लोकांनी जोरदार संघर्ष उभा केला आहे. शासनाच्या बंदर उभारणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी धाकटी डहाणू ग्रामपंचायतीने येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्रामस्थांची सभा जि.प. शाळेच्या प्रांगणात पार पडली. ग्रामस्थांमधील या नाराजीचा फटका निवडणुकीत बसण्याची भीती सर्वपक्षीयांना भेडसावते आहे.
दरम्यान, केळवे रोड पूर्व येथील पूर्व - पश्चिम पट्ट्याला जोडणाºया उड्डाणपुलाच्या मागणीसह रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रशासन गंभीर नसल्याने निवडणुकांवर टाकलेले बहिष्काराचे अस्त्र कृती समितीने बळकट करीत आपली भूमिका कायम केली.
वाढवण बंदर उभारणी व त्या अनुषंगाने बंदराला संरक्षण कवच बनलेल्या प्राधिकरणाला हटविण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू असल्याने त्या विरोधात जनमानसात प्रचंड संताप आहे. सेना पक्ष प्रमुखांच्या ‘आम्ही लोकांसोबत राहू’ या वक्तव्यावर विश्वास ठेवत मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत धाकटी डहाणू, गुंगवाडा, तडीयाळे, पोखरण, धूमकेत, रायतळे, वरोर, वाढवण, चिंचणी येथील मतदारांनी सेना - भाजपच्या उमेदवारांना मतदान केले. परंतु भाजप सरकारने प्राधिकरण हटविण्याच्या अथवा त्या प्राधिकरणात आपलेच पदाधिकारी नियुक्त करून वाढवण बंदराचा मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न केंद्रातून सुरू झाले होते. वाढवण बंदराबाबत मी लोकांसोबत आहे या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर लोकांचा विश्वास असला तरी आम्ही वाढवण बंदर होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घ्यावी अशी प्रांजळ अपेक्षा येथील मतदारांची आहे. खा. राजेंद्र गावित वगळता अन्य कोणीही लोकप्रतिनिधी आपली भूमिका अजूनही स्पष्ट करत नसल्याने वाढवण, धाकटी डहाणू, वरोर आदी भागातील तरु ण वर्ग भडकला आहे.
त्यांनी रस्त्यावर ‘एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द’ अशा विविध स्लोगन लिहून किनारपट्टी भागात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत जनजागृतीस सुरुवात केली आहे. याला किनारपट्टीवरील गावातून चांगला प्रतिसाद मिळत असून हे लोण अनेक गावांत सोशल मीडियाद्वारे पसरवले जात आहे. ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे उमेदवारांत भीतीचे वातावरण आहे.
समस्या प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांचा उद्रेक
रविवारी केळवे रोड परिसरातील ग्रामस्थांची एकित्रत बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची निर्णायक भूमिका घेण्यात आली. या परिसरातील नागरिकांचे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची ही भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. केळवे रोड पूर्व - पश्चिम जोडणारा उड्डाणपूल हा अतिशय जिव्हाळ्याचा व अत्यावश्यक विषय आहे. या समस्येमुळे परिसरातील जनता शैक्षणिक आणि आरोग्यविषयक
मूलभूत गरजांपासून वंचित राहते. वर्षानुवर्षे मतदानाचा हक्क बजावूनही अशा अनेक समस्या प्रलंबितच राहिल्याने उद्रेक होऊन जनतेने ही टोकाची भूमिका घेतली होती. या भूमिकेवर जिल्हाधिकाऱ्यांनी कृती समितीला चर्चेला बोलावले होते. मात्र समितीचे समाधान न झाल्याने त्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराची भूमिका कायम ठेवली आहे. निवडणुकांवर बहिष्कार घातलेल्या नागरिकांशी बोलून त्यावर उपाय योजना आखण्याबाबत मी पुन्हा त्यांच्याशी संवाद साधणार आहे.