भाजपला जिल्ह्यातून हद्दपार करा - आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 10:56 PM2020-01-02T22:56:59+5:302020-01-02T22:57:14+5:30
पाच वर्षे सत्तेत राहूनही पालघर जिल्ह्याचा विकास नाही; समस्या कायम असल्याचा केला आरोप
वाडा : भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या काळात पालघर जिल्ह्यातील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने काहीच हालचाली न झाल्याने जिल्हा विकासापासून दूर गेला आहे. त्यामुळे भाजपला या जिल्ह्यातून हद्दपार करा, असे प्रतिपादन कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कुडूस येथे प्रचार सभेत बोलताना केले.
वाडा येथे गुरुवारी आव्हाड यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते डाकवल, कुडूस, खुपरी, अबिडघर, खानिवली या ठिकाणी त्यांनी प्रचारसभा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कुडूस येथील प्रचारसभेत बोलताना ते पुढे म्हणाले की, भाजपच्या पालकमंत्र्यांनी या जिल्ह्यात विकासकामांची पाटी कोरी ठेवल्याने या जिल्ह्यात मला काम करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. या भागातील समस्यांचा पाढा वाचताना सर्वात मोठी भेडसावणारी समस्या तरुणांची वाढणारी बेरोजगारी असून ती दूर करून त्यांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी येथील घरघर लागलेल्या कारखानदारीला नवसंजीवनी देऊन नवीन उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आव्हाड यांनी या वेळी दिले. या वेळी कुडूस जिप गटातील उमेदवार दामोदर डोंगरे व गणातील उमेदवार सुरेखा बेंद्रे तसेच जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे, कुडूसचे उपसरपंच डॉ. गिरीश चौधरी, गवई गटाचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या रेखाताई पष्टे, काँग्रेसचे मुस्तफा मेमन, इरफान सुुुसे, रामदास जाधव, राष्ट्रवादीचे सुरेश पवार, निखिल पष्टे, तालुकाध्यक्ष रोहिदास पाटील, दीपक भोईर, अमीन सिंधू, काँग्रेसचे मुदस्सर पटेल, जिजाऊ सामाजिक संस्थेचे महेंद्र ठाकरे, अॅड. विवेक ठाकरे आदी उपस्थित होते.
जव्हारमध्ये तिरंगी-चौरंगी लढती
जव्हार : जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून तालुक्यातील काही जिल्हा परिषद गटात अतिशय चुरशीची लढत होत आहे. जि.प.च्या एकूण ४ गटासाठी २० उमेदवार आपले भवितव्य अजमावून पाहात आहेत. जि.प.च्या न्याहाळे बुद्रुक गटातून भाजपकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा थेतले रिंगणात असून काँग्रेसकडून तालुका अध्यक्ष केशव गावंढा यांनी त्यांना आव्हान दिले आहे. ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. विक्रमगडचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा तसेच जिल्हाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीसाठी ही लढत खूप महत्त्वाची मानली जात आहे. केळघर रांजणपाडा येथील संगीता शंकर खुताडे आणि प्रदीप वारघडे हे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
त्याचबरोबर कासटवाडी जि.प. गटासाठी चौरंगी लढत होत असून महिला राखीव गट असताना माजी पंचायत समिती सदस्य आणि राज्य महिला सदस्य ज्योती हरिशचंद्र भोये या भारतीय जनता पक्षाकडून लढत आहेत. शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब विनायक राऊत लढत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अंजली सुभाष लाखन तर रुपाली हेमंत घेगड या बहुजन विकास आघाडीकडून लढत आहेत. वावर या महिला राखीव गटातून मनीषा यशवंत बुधर तर कमल उमाकांत सपकाळे व मुंती मधू भोये या लढत आहेत. कौलाळे गटातून तिरंगी लढत होत असून भारती चिंतू चौधरी तर सुनीता कमलाकर धूम, तर सुमित्रा संतोष सोळे लढत आहेत. या लढतींकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
विक्रमगडमध्ये रंगणार चौरंगी लढती
विकमगड : तालुक्यातील पंचायत समितीच्या १० जागांसाठी ५४, तर जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी ३२ उमेदवार रिंगणात आहेत. अनेक मतदारसंघांमध्ये चौरंगी लढती होणार असून तिकीट नाकारल्याने अनेकांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवलेली आहे. जिल्हा परिषदेच्या आंलोडा गटातून पालघर विकास आघाडीचे उमेदवार नीलेश सांबरे व त्यांच्याविरोधात शिवसेनेचे मिठाराम भोईर यांच्यात चुरशीची लढाई होणार आहे. या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने ही लढत दुरंगी होणार आहे.
हा मतदारसंघ मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. कुर्झे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवा सांबरे, भाजपचे प्रवीण संख्ये, शिवसेनेचे विजय वेंखडे, काँग्रेसच्या शरयू औसरकर, मनसेचे ज्ञानेश्वर पाटील, माकपा विलास पाटील असे ९ उमेदवार रिंंगणात आहेत. तर उटावली गटात भाजपचे कमलाकर भोईर, राष्ट्रवादीचे संदेश ढोणे, शिवसेनेचे सुरेश पालवी, मनसेचे सतीश जाधव असे ७ उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीत भाजपला फटका बसला असून दोन पं.स. व एक जि.प. जागेवरील अर्ज त्यांच्या उमेदवारांनी मागे घेतले आहेत.
दादडे गटातून भाजपचे यशवंत भावर, शिवसेनेचे शंकर रडे, राष्ट्रवादीचे गणेश कासट, माकपाचे विलास गहला, मनसेचे नितीन हाडळ असे एकूण ८ उमेदवार आहेत. तर तलवाडा गटातून शिवसेनेचे भारती कामडी, भाजपा सीमा डगला, राष्ट्रवादी माधुरी दोडे, माकपा सीता केंझरा, असे ९ उमेदवार रिंगणात आहे सर्वच पक्षाचे उमेदवार रिंगणात असून आपले नशीब अमजावत आहेत.
भाजपच्या पालकमंत्र्यांनी या जिल्ह्यात विकासकामांची पाटी कोरी ठेवल्याने या जिल्ह्यात मला काम करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. या भागातील तरुणांची वाढणारी बेरोजगारी ही सर्वात मोठी भेडसावणारी समस्या आहे.