खड्डेमय रस्त्यांत चांद्रसफरीची अनुभूती, मनसेचे ‘अंतराळवीर’ उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 02:29 AM2020-09-01T02:29:13+5:302020-09-01T02:29:33+5:30
चंद्रावर पाणी आहे की नाही हे शोधण्यासाठी तेथे जाण्याची गरज नाही. वसई-विरारमधील जे खड्डेमय रस्ते आहेत, त्यात साचलेल्या पाण्यातून चालल्यानेही चंद्रावर पोहोचल्याचा अनुभव येईल. सध्या पावसाळ्यात वसई-विरारमधील खड्ड्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.
पारोळ : वसई-विरारमधील हातभर खड्ड्यांमुळे वाहन चालक, नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे जनतेत आक्रोश असताना मनसेने वसई-विरार महापालिकेला इशारा दिला होता. मात्र महापालिकेने त्याकडे कानाडोळा केल्याने अखेर सोमवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पीपीई कीट आणि पांढरे हेलमेट घालून अंतराळवीर बनून भिवंडी-कामण रोडवरील खड्ड्यांवर चालून प्रत्यक्ष चंद्रावर पोहोचल्याचा प्रतिकात्मक अनुभव घेतला.
चंद्रावर पाणी आहे की नाही हे शोधण्यासाठी तेथे जाण्याची गरज नाही. वसई-विरारमधील जे खड्डेमय रस्ते आहेत, त्यात साचलेल्या पाण्यातून चालल्यानेही चंद्रावर पोहोचल्याचा अनुभव येईल. सध्या पावसाळ्यात वसई-विरारमधील खड्ड्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यांत पडलेले खड्डे इतके धोकादायक बनलेत की वेळीच हे खड्डे बुजवले गेले नाहीत, तर एखाद्याचा त्यात जीव जाण्याचा धोका आहे. वसई महापालिका परिसरातील कामण-चिंचोटी-भिवंडी रोड, गोखिवरे ते पुढे वसईफाटा येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. खड्डेमय रस्त्यांतून वाहने चालवताना वाहनांचे स्पेअर पार्ट भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे खराब होत असल्याने वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना मोठे खड्डे चटकन लक्षात येत नसल्याने वाहने खड्ड्यांत आपटून त्यांचे नुकसान होत आहे. बऱ्याच वाहन चालकांना त्यामुळे इजाही झाली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेने याविरोधात महापालिकेला खड्ड्यातच झाडे लावण्याचा इशारा दिला होता. मात्र तरीही महापालिकेने त्याकडे कानाडोळा केल्याने अखेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कामण-भिवंडी रोडवरील खड्ड्यांमधून अंतराळवीराचा गणवेश घालून चंद्रावर पोहोचल्याचा प्रतीकात्मक टोला महापालिका प्रशासनाला लगावला आहे.