तारापूर एमआयडीसीमध्ये केमिकल कारखान्यात स्फोट, सहा कामगार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 12:15 PM2021-07-05T12:15:20+5:302021-07-05T12:16:15+5:30
एमआयडीसीतील भारत केमिकल नावाच्या कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागून नंतर स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या स्फोटामुळे काही भागात आग लागली.
बोईसर : तारापूर एमआयडीसीतील कंपनीत शनिवारी रात्री ९ च्या सुमारास झालेल्या जोरदार स्फोटात सहा कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एमआयडीसीतील भारत केमिकल नावाच्या कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागून नंतर स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या स्फोटामुळे काही भागात आग लागली. या आगीवर अग्निशमन दलाच्या दोन बंबांच्या साहाय्याने नियंत्रण मिळवण्यात यश आले असून स्फोटातील जखमींना शेजारील कंपनीतील कामगार व स्थानिक गावातील नागरिकांनी तत्काळ उपचारासाठी जवळच्या संजीवनी रुग्णालयात दाखल केले. तसेच स्थानिक बोईसर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे यांच्या मदतीने कंपनीत अडकलेल्या कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आले.
या वेळी अमरसिंग कुशवाह (४२), व्यासमुनी सिंह (४३), वीरेंद्र यादव (२३), सुबोधकुमार ऋषी (२०), नागेंद्र प्रजापती (२६), भोजकुमार शर्मा (२२) जखमी झाले आहेत. तर अन्य दोन कामगार स्फोटानंतर बाहेर पडण्याच्या प्रयत्नात खाली पडून किरकोळ जखमी झाले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना त्वरित सोडून देण्यात आले आहे. तर चार कामगार आगीत भाजल्याने जखमी झाले असून त्यांच्यावर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.