बोगस भरती रॅकेटचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:28 PM2020-02-17T23:28:21+5:302020-02-17T23:28:45+5:30
जि.प.चे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अटकेत : आणखी मोठे मासे गळाला लागणार?
हितेन नाईक
पालघर : बोगस शासन निर्णयाच्या आधारे ८० शिपायांची भरती करणाऱ्या अधिकारी आणि दलालांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. या प्रकरणात पालघर जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा रायगडचे जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रकाश देवऋषी व त्यांच्या सहकाºयाला पालघरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करीत सोमवारी पालघर न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्रालयातील ग्रामविकास विभागाचे अवर सचिव भरत पाटील यांनी आपल्या सहीनिशी बनविलेल्या बोगस शासन निर्णयाचा आधार घेत अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील ८० शिपायांना (परिचर) पालघर जिल्हा परिषदेत सामावून घेत बोगस नोकºया दिल्या होत्या. केंद्र शासनामार्फत २००९-१० या वर्षांपासून राज्यात अपंग एकात्मिक शिक्षण योजना माध्यमिक स्तर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर अपंग समावेशित शिक्षण योजना ही योजना नव्याने राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यामुळे अगोदरची अपंग एकात्मिक शिक्षण योजना १ मार्च २००९ पासून बंद करण्यात आली. यानुसार बंद झालेल्या योजनेमुळे या योजनेतील कार्यरत विशेष शिक्षक व परिचर यांचे १५ सप्टेंबर २०१० च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शाळांमध्ये समायोजन करण्याचा आधार घेऊन पालघरच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकरी निधी चौधरी यांनी शिक्षण उपसंचालक (पुणे) यांना पत्र लिहून त्याद्वारे पालघरमध्ये रिक्त असलेली २११ पदे भरण्यासाठी प्रतीक्षा यादीवरील शिपाई कर्मचाऱ्यांना पालघर जिल्ह्यात सामावून घेण्याची तयारी दर्शविली होती. या समायोजनेला पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी आक्षेप नोंदवीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवीत चौकशीची मागणी केली होती.
परिचर नियुक्ती : एकूण ८८ आरोपी
च्या प्रकरणातील आरोपी सखाराम मोते यांच्या घराच्या झडतीत मंत्रालयातील अवर सचिव, ग्रामविकास विभागाच्या भरत पाटील यांच्या सहीनिशी २७ नोव्हेंबर २०१७ अन्वये बोगस शासन निर्णय मिळून आला होता. हे खोटे अनधिकृत व बनावट पत्राचा आधार घेऊन जिल्हा परिषदमध्ये ८० परिचरांच्या नियुक्त्यांचे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला होता.
च्तत्कालीन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी, वरिष्ठ सहाय्यक रमेश पवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रमोद कहू यांनी काही वरिष्ठ अधिकाºयांच्या आशीर्वादानेच या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या, असा आरोप आहे. या परिचर नियुक्ती घोटाळ्यात
८० परिचरपदी नियुक्त कर्मचाºयासह अन्य ८ असे एकूण ८८ आरोपी आहेत.
भरत पाटील यांच्याभोवतीचा फास आवळला? : प्रकाश देवऋषी यांना १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या नवी मुंबईमधील खारघर येथील फ्लॅटमधून अटक केली होती. त्यामुळे या अवर सचिव भरत पाटील यांच्याभोवतालचा फास आवळला गेला असून त्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या प्रकरणात अनेक वरिष्ठ अधिकाºयांचा समावेश असून परिचर आणि अनुकंपा भरतीतील सर्व दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही.
- सचिन पाटील, माजी उपाध्यक्ष