फेसबुक फ्रेंड हत्या प्रकरण, सेक्सनंतर रक्तस्त्रावाने आरोपी गेला गोंधळून
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 09:34 AM2018-02-20T09:34:04+5:302018-02-20T10:31:35+5:30
फेसबुकवरुन मैत्री झाल्यानंतर मित्राला भेटायला नालासोपारा येथे गेलेल्या अंकिता मोरे या 20 वर्षीय तरुणीची रविवारी हत्या झाली. या प्रकरणात नवीन धक्कादायक तथ्य समोर आले आहे.
ठाणे - फेसबुकवरुन मैत्री झाल्यानंतर मित्राला भेटायला नालासोपारा येथे गेलेल्या अंकिता मोरे या 20 वर्षीय तरुणीची रविवारी हत्या झाली. या प्रकरणात नवीन धक्कादायक तथ्य समोर आले आहे. अंकिताने आरोपी हरिदास निरगुडेची (21) सेक्सची मागणी फेटाळून लावल्यामुळे संतापलेल्या हरिदासने बुटांच्या लेसच्या सहाय्याने अंकिताचा गळा आवळून निर्घृण हत्या केली असे सुरुवातीला समोर आले होते. पण आता हरिदासने अंकितावर लैंगिक जबरदस्ती केल्याची कबुली दिली आहे.
तिचा शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर याबद्दल अधिक स्पष्टता येईल. वाशीला राहणा-या 20 वर्षीय अंकिता मोरेची फेसबुकच्या माध्यमातून हरिदास निरगुडे नावाच्या 25 वर्षीय तरूणाशी मैत्री झाली होती. रविवारी पहिल्यांदाच अंकिता त्याला भेटायला नालासोपारा पूर्वेला त्याच्या घरी गेली होती. अलकापुरी भागातील तानिया मोनार्क या चार मजली इमारतीत हरिदास निरगुडे तळमजल्यावर राहतो.
सहा महिन्यांपूर्वी निरगुडेची अंकिताबरोबर फेसबुकवरुन मैत्री झाली होती.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार निरगुडेने लैंगिक जबरदस्ती केल्यानंतर अंकिताच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरु झाला. रक्त येत असल्यामुळे अंकिताने घरातून बाहेर जाण्यास नकार दिला. त्यामुळे हरिदास गोंधळून गेला. हरिदास त्याच्या बहिणीसोबत राहतो. कुठल्याही क्षणी बहिण घरी येईल आणि अंकितासोबत अशा अवस्थेत पाहिले तर आपली रवानगी थेट गावी होईल अशी भिती हरिदासला होती. त्याच भितीपोटी गोंधळलेल्या हरिदासने बुटांच्या लेसच्या सहाय्याने अंकिताचा गळा आवळून निर्घृण हत्या केली.
इमारतीत राहणाऱ्या एका रहिवाशाने अंकिताचा मृतदेह सुमारे 7.15 वाजता तळमजल्याशेजारच्या जिन्यावर पाहिला, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता अशी माहिती आहे. पोलिसांनी अंकिताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याने गुन्हा कबूल केला आहे. निरगुडे एका गिफ्ट शॉपमध्ये सेल्समनची नोकरी करतो. त्याने अंकिताला घरी बोलावले होते.