जाळ्यातील व्हेलची सुखरूप मुक्तता; मच्छीमारदिनीच घडला महाथरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:38 AM2018-11-22T00:38:47+5:302018-11-22T00:38:55+5:30
वडराई बंदरातून समुद्रात मासेमारीला गेलेल्या ‘अमर साई’ ह्या बोटींच्या डोल जाळ्यात सापडलेल्या अवाढव्य शार्क व्हेल माशाची सुखरूप सुटका करण्यात मच्छीमाराना यश मिळाले.
पालघर : वडराई बंदरातून समुद्रात मासेमारीला गेलेल्या ‘अमर साई’ ह्या बोटींच्या डोल जाळ्यात सापडलेल्या अवाढव्य शार्क व्हेल माशाची सुखरूप सुटका करण्यात मच्छीमाराना यश मिळाले. आपले जाळे फाडून व नुकसान सहन करून मच्छीमारांनी त्याची सुटका केली व आपला जागतिक मच्छिमार दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला.
तालुक्यातील वडराई हे ताज्या बोंबीलांसाठी प्रसिद्ध असून मंगळवारी हितेंद्र मेहेर हे बोट घेऊन पहाटे ४ वाजता मासेमारीला गेले होते. समुद्रात १२ नॉटिकल मैल क्षेत्रात त्यांनी आपल्या बोटीतील डोल जाळी कवी च्या खुंटाना रोवली. काही वेळा नंतर हे डोल जाळे खेचत असतांना त्यांना सुमारे २५ ते ३० फुटांचा शार्क व्हेल मासा जाळ्यात अडकून सुटके साठी धडपडत असल्याचे दिसले. बोटीतील सर्व मच्छिमारांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. बोटीत असलेल्या घोशाच्या (काठीला बांधलेले टोकदार आयुध) सहाय्याने त्याच्या शरीरा भोवती लपेटलेले जाळे त्याला कुठलीही इजा न करता तोडून टाकण्यात यश मिळवले. आणि तो पाण्यात दिसेनासा झाला.
अत्यंत खतरनाक म्हणून ओळखला जाणारा हा मासा मोठा असून शांत असतो. करंदी, मांदेली आदी लहान लहान मासे खाऊन जगतो. शार्क प्रमाणे तो अजिबात हल्ला करीत नाही. समुद्री पर्यावरण राखण्यात ह्या माशाचा मोठा वाटा असून ह्या माशाने आपल्या शरीरातून टाकलेल्या महाकाय विष्ठेच्या आसपास मोठ्या प्रमाणात प्लवंगाची निर्मिती होत असल्याचे झुआॅलॉजीचे प्राध्यापक भूषण भोईर यांनी लोकमतला सांगितले. या प्लवंगा शेजारीच मासे आपली अंडी घालीत असल्याने माशाच्या पिलांचे संवर्धन होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सातपाटी, डहाणू गावासमोरील समुद्रात मोठ्या प्रमाणात व्हेल, शार्क, डॉल्फिन, आदी माशांचे वास्तव्य असून वाढवणं बंदर, कॉरिडॉर मुळे ह्या माशाचा अधिवासच नष्ट होणार आहे. -प्रा.भूषण भोईर