लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर खरेदीसाठी वसईमध्ये जत्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 11:53 PM2020-11-15T23:53:24+5:302020-11-15T23:53:36+5:30
सोन्याच्या, कपड्याच्या, गाड्यांच्या शोरूममध्ये उसळली मोठी गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : दिवाळी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा सण असून खरेदीसाठी शुभमुहूर्त मानला जात असतो. यामुळे आपल्या घरात सोने, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू वा इतर काही तरी नवीन वस्तू यावी यासाठी धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडवा या दिवाळीतील दिवसांच्या मुहूर्तावर खरेदी शुभ मानली जात असल्याने या दिवसात बाजारात मोठी उलाढाल होते. दरम्यान, वसई, विरार, नालासोपारा परिसरात दिवाळीत भाऊबिजेसाठी कपड्यांच्या खरेदीसाठी बाजारात नागरिकांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठी गर्दी केली होती.
वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्यात या वर्षी कोरोनाचा संसर्ग, आर्थिक मंदी, परतीचा पाऊस याचा फटका बाजाराला बसल्याने खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद कमी आहे. मात्र दुकानदार वेगवेगळ्या सवलती देत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरेदी हा झगमगत्या जीवनशैलीचा दैनंदिन अविभाज्य घटक असला तरी दिवाळीच्या निमित्ताने भरणारी खरेदीची वार्षिक जत्रा कायम आहे. दिवाळीच्या निमित्ताने कपड्यांपासून चीजवस्तूंपर्यंत आणि धान्यापासून मिठायांपर्यंतच्या खरेदीला एकदम तेजी येते.
याशिवाय फटाके, रांगोळी, कंदील, रोशणाईचे दिवे यांचा बाजारही भरू लागतो. राहिलेच तर दिवाळसणाच्या मुहूर्तावर दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर, गाडी यांच्या खरेदीचेही बेत आखले जातात. गेल्या काही वर्षांत रुजलेल्या मॉल संस्कृतीने दिवाळीनिमित्त बाजारात भरणाऱ्या खरेदीच्या उत्साहात भर घातली आहे. त्यात आता ऑनलाइन शॉपिंगची नवलाई अवतरली आहे. दुकानात जाऊन थेट खरेदी करण्यापेक्षा
अशी व्हर्च्युअल खरेदी काहीशी
स्वस्त असल्याने स्मार्ट ग्राहक
आता हा पर्याय निवडू लागले आहेत. विशेषत: तरुणवर्ग अशा प्रकारच्या ऑनलाइन शॉपिंगला पसंती देताना दिसत आहेत.
वाहन खरेदी जोरात
वसई तालुक्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाहन खरेदी जोरात दिसून आली. मंदीचे सावट असतानाही वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला. वाहनांचे भाव १० टक्क्यांनी वाढले असतानाही ग्राहकांसाठी वाहनांची बुकिंग मिळत नसल्याचे शोरूम मालकांनी सांगितले.