व्यापाऱ्यास २६ लाखांना गंडवणाऱ्या तोतया सीबीआय कमिश्नरला पोलीस कोठडी
By धीरज परब | Published: September 12, 2023 02:18 AM2023-09-12T02:18:55+5:302023-09-12T02:19:31+5:30
फसवणूक करणाऱ्या तोतया सीबीआय कमिश्नरला काशीमीरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मीरारोड - स्वतःला सीबीआयचा कमिश्नर असल्याचे सांगत एका व्यापाऱ्यास जीएसटीची क्लीन चिट मिळवून देतो व गुंतवणुकीत चांगला नफा मिळवून देतो, असे सांगून २६ लाखांची फसवणूक करणाऱ्या तोतया सीबीआय कमिश्नरला काशीमीरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मेटल रिफायनरीचा व्यवसाय असलेले दिनेशप्रताप सिंग हे नायगावच्या रिलायबल गार्डन मध्ये राहतात. नया नगर भागातील एका पानवाल्याच्या माध्यमातून त्यांची ओळख स्वतःला सीबीआय चा कमिश्नर असल्याचे सांगणाऱ्या सोहेल अब्दुल आर. खान रा. गौरव वुड, बेव्हर्ली पार्क, मीरारोड याच्याशी झाली होती.
सिंग यांना जिएसटी विभाग कडून अडचण आल्याने सोहेल याने जीएसटी कमिश्नर कडून क्लीन चिट मिळवून देतो सांगून पैसे उकळण्यास सुरवात केली. त्या निमित्ताने त्यांची काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील दोन मोठ्या हॉटेलां मध्ये भेटी झाल्या. नंतर सोहेल याने चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करून चांगला नफा कमवून देतो असे आमिष सिंग याना दाखवले. जीएसटीची क्लीनचिट आणि गुंतवणुकीसाठी म्हणून सोहेल याने रोख आणि ऑनलाईन द्वारे २६ लाख रुपये सिंग यांच्या कडून उकळले.
जीएसटीची क्लीनचिट मिळाली नाहीच शिवाय घेतलेले २६ लाख सोहेल परत करत नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सिंग यांनी काशीमीरा पोलिसात फिर्याद दिल्यावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सोहेल याला अटक करण्यात आली असून ठाणे न्यायालयाने त्याला १४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम यांच्या मार्गदर्शनखाली सहायक निरीक्षक महेश मनोरे पोलीस पुढील तपास करत आहेत.