बनावट कागदपत्रे आणि सीसीचा वसई तालुक्यात सुळसुळाट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 05:57 PM2023-08-08T17:57:53+5:302023-08-08T17:58:39+5:30
वसई विरार मनपाच्या कार्यक्षेत्रात बनावट सीसी आणि कागदपत्रे, सरकारी बनावट स्टँप बनवून बांधकामे जोरदार सुरु असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
मंगेश कराळे
नालासोपारा :- वसई विरार मनपाच्या कार्यक्षेत्रात बनावट सीसी आणि कागदपत्रे, सरकारी बनावट स्टँप बनवून बांधकामे जोरदार सुरु असल्याचे स्पष्ट झालेले आहे. वसई तालुक्यात बनावट सीसीचा सुळसुळाट कसा चालू आहे याबाबत विरार पोलीस ठाण्याला गुन्हा उघड झाल्यानंतर बांधकाम करणाऱ्या बिल्डरांमध्ये एकच खळबळ माजली आहे. या इमारतीत सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये बोगस सीसीचे गुन्हे दाखल झाले आहेत. बोगस सीसी बनवून इमारतींची बांधकामे करुन सर्व सामान्य ग्राहकांची फसवणूक करण्याचे वसई विरार परिसरात सरार्स प्रकार सुरु असल्याचे उघड झाले आहे.
मुंबईपासून अगदी जवळच असलेल्या आणि तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसई तालुक्यात घरे घेणाऱ्या ग्राहकांची मागणी जोरदार असल्यामुळे बांधकाम व्यवसायिकांनी जोरदार बांधकामे सुरु केली. काही जणांनी आरक्षित जागेवर तर काहींनी बोगस सीसी, बनावट कागदपत्रे, बनावट स्टँप बनवून कामे धुमधडाक्यात सुरु केली. विरार पोलीस ठाण्यात बोगस कागदपत्रे आणि बनावट सीसीचे अनेक प्रकार उघडकीस आल्याने वसई विरार नाही तर मुंबईमध्येही खळबळ माजली होती.
दरम्यान, ५५ इमारतीच्या बोगस सीसीची प्रकरण चव्हाट्यावर आल्याने सदनिका खरेदीदारांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर आयुष्याची जमापुंजी गुंतवून या इमारतींमध्ये घर घेणार्या लोकांवरही टांगती तलावर लटकत आहे. या सर्व प्रकरणांमध्ये पालिका आयुक्त आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
१०० इमारतीचे गुन्हे दाखल करण्यास मनपाची टाळाटाळ
मागील मार्च महिन्यापासून विरार पोलिसांनी अश्याच प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे उभारण्यात आलेल्या १०० इमारतीचे गुन्हे दाखल करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आले आहे. पण मनपाच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करत कानाडोळा केला जात आहे. विरार पोलिसांनी ५५ इमारत प्रकरणी पाच टीम तयार करून गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली आहे.
१) आरोपींना वसई न्यायालयात मंगळवारी हजर केल्यावर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेची काही या इमारतीत फसवणूक केली आहे का याचाही तपास केला जात आहे. - राजेंद्र कांबळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी)
१) ज्या बांधकाम व्यवसायिकाविरोधात बनावट कागदपत्रे, बोगस सीसी बनवून बांधकामे करत आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्यानंतर परत त्याला किंवा त्यांच्या कंपनीला नगररचना विभाग आणि वसई विरार मनपाने यापुढे कुठेही बांधकाम करण्यासाठी परवानगी देऊ नये तेव्हा पुढे अशी प्रकरणे उघडून गरिबांची फसवणूक होणार नाही. - नरेंद्र बाईत (समाजसेवक)
2) वसई तालुक्यात सध्या बोगस सीसीचा सुळसुळाट सुरु आहे. यामुळे लाखो लोकांची फसवणूक होत असून अनेक बँका सुद्धा डुबल्या जाणार आहे. ज्यांच्यावर बोगस सीसीचे गुन्हे दाखल झाले आहेत त्यापैकी निम्मेच्यावर कार्यकर्ते हे पोस्टरवर फोटो लागणारे आहे. - प्रवीण गुरव