बनावट सोन्याचा सूत्रधार मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:43 AM2017-08-03T01:43:29+5:302017-08-03T01:43:29+5:30
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके च्या मोखाडा शाखे मध्ये फेब्रुवारी २०१६ मध्ये उघडकीस आलेल्या बनावट सोने तारण कर्ज घोटाळ्याला दिड वर्ष झाले तरी त्याचा सूत्रधार मोकाट आहे.
रवींद्र साळवे ।
मोखाडा : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके च्या मोखाडा शाखे मध्ये फेब्रुवारी २०१६ मध्ये उघडकीस आलेल्या बनावट सोने तारण कर्ज घोटाळ्याला दिड वर्ष झाले तरी त्याचा सूत्रधार मोकाट आहे. स्थानिक पोलीस तपास सुरू आहे एवढेच सरकारी उत्तर देत आहेत. त्यावरून या तपासाची कूर्मगती स्पष्ट होते. पोलिसांच्या या निष्क्रियतेबाबत तालुक्यात संताप व्यक्त होतो आहे. विशेष म्हणजे बँकदेखील हा तपास जलद गतीने व्हावा यासाठी कोणतेही प्रयत्न करीत नसल्याने तिच्याबद्दलही संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परंतु यामधील खेदाची बाब म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी हेमंत उदावंत सह एकूण पाच आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून फरार असून मोखाडा पोलिसांचा मात्र अद्यापही तपास चालू असल्याने त्यांच्या मोकाट मुसक्या मोखाडा पोलीस कधी आवळणार या प्रश्नाचे उत्तर पोलीस अधीक्षक शिंगे हे तरी देणार काय? असा प्रश्न विचारला जात आहे.
मोखाडा शहरामध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून उदयास आलेला हेमंत उदावंत हा अवघ्या काही वर्षातच करोडपती झाल्याने तालुकाभर चर्चेचा विषय ठरला होता. मात्र अवघ्या काही दिवसातच त्याच्या अमाप मायेचे बिंग फुटले. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेतील २.७३ कोटीच्या बनावट सोने तारण कर्ज घोटाळ्याचा तो सूत्रधार असल्याचे उघड झाले. त्याने आपली पत्नी, शाखा व्यवस्थापक मोरे, शाखा हिशेबनीस गावित व बँकेचा व्हॅल्युअर चंद्रकांत बागुल, बँकेचा वॉचमन तसेच आपला वाहनचालक वसिम मणियार व अन्य कामगार अशा एकूण १७ लोकांच्या नावे मोखाडा शाखेत ५ किलो ३३७ ग्रॅम म्हणजे जवळपास
२ कोटी ७३ लाखाचे बनावट सोने तारण ठेऊन कर्ज घेतले. परंतु त्याची परत फेड वेळेत न झाल्याने तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या १७ कर्जधारकांवर मोखाडा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु मुख्य आरोपी सह एकूण पाच आरोपी मात्र फरार असून जव्हात मोखाडा येथे या सूत्रधाराचे राजरोस येणे जाणे होत असते.
त्यामुळे मोखाडा पोलीस त्याच्यावर मेहरबान आहेत काय? अशी चर्चा सुरू आहे. सूत्रधारासह सर्व फरारींना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.