दुर्गाष्टमीच्या नावाखाली बोगस लकी ड्रॉ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:57 PM2018-10-14T23:57:15+5:302018-10-14T23:57:37+5:30
तलासरी : सद्या दुर्गाष्टमी म्हणजे नवरात्री उत्सव सुरू असून या उत्सवा साठी मंडळे तसेच हौसिंग सोसायट्या वर्गणी बरोबर लकी ...
तलासरी : सद्या दुर्गाष्टमी म्हणजे नवरात्री उत्सव सुरू असून या उत्सवा साठी मंडळे तसेच हौसिंग सोसायट्या वर्गणी बरोबर लकी ड्रॉ काढून लाखो रु पये जमा करीत आहेत. यात मोठा गैर व्यवहार होत असून शासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जनतेच्या पैशाचा अपहार होत आहे. याप्रकरणी कारवाईची मागणी तलासरीतून होत आहे.
तलासरीमध्ये नवरात्री उत्सवा साठी हौसिंग सोसायट्यांनी लकी ड्रॉ तिकिटे काढली असून या तिकिटांची संख्या काही हजाराच्या घरात असून यातून लाखो रुपये जमा होणार आहेत. यात नाममात्र बक्षिसे दिली जाणार असल्याने उरलेल्या रक्कमेचा अपहार होणार हे स्पष्ट आहे. वास्तविक लकी ड्रॉ काढताना शासकीय परवानगी घेणे गरजेचे असते परंतु तलासरीमध्ये काढण्यात येत असलेल्या लकी ड्रॉ ची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही.
खुले आम ही लकी ड्रॉ ची तिकिटे विकली जात असताना शासकीय अधिकारी मात्र सुस्त असल्याने या विना परवानगी काढण्यात येणाऱ्या लकी ड्रॉ ला त्याचा वरदहस्त असावा असा आरोप जनतेतून होत आहे नऊ दिवस गरब्यासाठी येणाऱ्या लोकांना बक्षिसांची आमिषे दाखवून तिकिटे त्यांना दिली जात आहेत. या लकी ड्रॉ तील विजेत्यांना १८ आॅक्टोबर ला दसऱ्याच्या दिवशी बक्षिसांची वाटप होणार आहे. वर्षानुवर्षे परवानगी न घेता उत्सवाच्या नावाखाली लकी ड्रॉ काढून सुरू असलेली जनतेची लूट शासन कारवाई करून कधी थांबविणार? पालघर जिल्हाधिकारी यावर कारवाई करतील काय? पोलिसांचे आर्थिक गुन्हे विभागही याबाबत अनिभज्ञ आहे.