‘फाटकशाहीने’ सेना थंड! पक्षप्रमुखांना जाग येणार कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 05:23 AM2018-11-12T05:23:57+5:302018-11-12T05:24:17+5:30
पक्षप्रमुखांना जाग येणार कधी : उपऱ्यांचे देव्हारे माजविणे थांबणार कधी?
विशेष प्रतिनिधी
पालघर : या जिल्ह्यात गेले वर्षभर सुरू असलेल्या संपर्कप्रमुखांच्या फाटकशाहीमुळे व त्यांनी जिल्हा प्रभारी व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी करून माजविलेल्या उपऱ्यांच्या देव्हाऱ्यामुळे या जिल्ह्यातील शिवसेना अक्षरश: मृतवत झाली आहे.
२३ आॅक्टोबर २०१७ ला अनंत तरे यांचा वाढदिवस होता. त्याच दिवशी त्यांना पालघर संपर्कनेते पदावरून घालवून मातोश्रीने रवींद्र फाटक यांना संपर्कप्रमुख केले. त्यामागे त्यांचे गॉडफादर एकनाथ शिंदे यांनी मारलेली चावी होती. त्यांच्या पाठोपाठ शिरीष चव्हाण आणि उत्तम पिंपळे या दोन शहर व ग्रामीण जिल्हाप्रमुखांची गच्छंती झाली. त्यांच्या जागी वसंत चव्हाण आणि राजेश शहा यांना नेमले गेले. त्यामागे फाटक व शिंदेशाहीच होती. नंतर लोकसभा पोटनिवडणुकीतही श्रीनिवास वनगा या उपºयाला उमेदवारी दिली गेली. याचा परिणाम सेनेवर झाला. जिल्हाप्रभारी आणि जिल्हासंपर्क प्रमुख दोन्हीही ठाण्याचे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांना भेटणारा त्यांच्याशी संवाद साधणारा एकही नेता सध्या नाही. काही महिन्यांपूर्वी ज्योती ठाकरे आणि जगदीश धोडी यांना महामंडळाचे अध्यक्षपद दिले गेले. त्यांचे पक्षकार्य काय? पक्षासाठी त्यांनी केले काय? असा प्रश्न सैनिकांच्या मनात खदखदतो आहे. गेल्या वर्षभरात शिवसेनेने किती आंदोलने कुठल्या प्रश्नावर केली? असाही सवाल शिवसैनिकांनी केला आहे. सुधा चुरी ज्या महिला आघाडी प्रमुख होत्या. मीना कांबळी या ज्येष्ठ नेत्या होत्या. त्यांना सोडून ज्योती ठाकरेंना महामंडळ का दिले? धोडीही अलिकडे पक्षात आले. फाटकही आताच आलेत. त्यांनाही आमदारकी संपर्कप्रमुखपद का? याचा अर्थ फाटक हे उपरे. त्यांनी व शिंदेंनी सेनेत उपरेशाही आणली, अशी टीका मावळे करीत आहेत. (भाग-२ उद्या)
शिवसेनेचे अस्तित्व जिल्ह्यात जाणवत नाही
लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशा स्थितीत संपर्कप्रमुख किती दिवस आणि वेळ जिल्ह्यात असतात. कोणत्या प्रश्नावर किती आंदोलने केलीत? याचा लेखाजोखा पक्षप्रमुखांनी फाटकांकडून घ्यावा.
सध्या जिल्ह्यात मार्क्सवादी, श्रमजिवी हेच प्रत्येक प्रश्नावर मोठी आंदोलने करीत आहेत. त्यानंतर राष्टÑवादी आणि काँगे्रस आंदोलने करीत आहेत. परंतु सेनेचे गेल्या वर्षभरात एकही मोठे आंदोलन नाही,याला जबाबदार कोण?
सामान्य आणि निष्ठावंत शिवसैनिकांना डावलल्यानेच पालघर जिल्हा परिषद सेनेच्या हातून गेली. सेनेला भाजपच्या तालावर नाचावे लागते आहे. ही स्थिती शिवसेनेला तातडीने बदलावी लागणार आहे.