धोडींच्या कुटुंबीयांना मिळाले चार लाख
By admin | Published: October 7, 2016 04:35 AM2016-10-07T04:35:51+5:302016-10-07T04:35:51+5:30
गेल्यावर्षी वाहत्या नाल्यात पडून बोईसर राणी शिगाव येथील सुभाष धोडी यांचा मृत्यू झाला तरी प्रशासकीय गफलतीमुळे त्यांना नाकारली गेलेली चार लाखांची भरपाई
पालघर : गेल्यावर्षी वाहत्या नाल्यात पडून बोईसर राणी शिगाव येथील सुभाष धोडी यांचा मृत्यू झाला तरी प्रशासकीय गफलतीमुळे त्यांना नाकारली गेलेली चार लाखांची भरपाई तहसीलदार महेश सागर यांच्या पाठपुरव्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली.
सुभाष हे कामानिमित्त २७ जून २०१६ रोजी बाहेर पडल्यानंतर जोरदार सुरु झालेल्या पावसामुळे एका नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेले. ते बेपत्ता झाल्याची नोंद त्यांची पत्नी लता धोडी ह्यांनी बोईसर पोलीस स्टेशन मध्ये नोंद केली होती.सुभाष धोडी ह्यांचा मृतदेह ३० जून रोजी सापडल्या नंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
नैसिर्गक आपत्तीत शासनाच्या वतीने मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानासाठी संबंधित तलाठ्यांनी पंचनामा करून सुभाष धोडी यांचे प्रकरण पालघरचे तत्कालीन तहसीलदारा कडे पाठविले होते.मात्र त्यांनी त्यांचा मृतदेह सापडला त्यादिवशी (३० जून) पाऊस पडला नसल्याचा शेरा मारून सानुग्रह अनुदान देता येणार नसल्याचे कळविले होते. त्यामुळे घरातल्या कमावत्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर मोठे संकट ओढवले असतांना शासनाकडून मिळणारी भरपाईदेखील नाकारण्यात आल्याने धोडी कुटुंबावर दुहेरी संकट ओढवले होते. हेच प्रकरण विद्यमान तहसीलदार महेश सागर यांच्या समोर आल्यानंतर त्यांनी कागदपत्रे चाळली असता सुभाष ज्या दिवशी नाल्यात पडून वाहून गेले त्यादिवशी ११५ मिलीमीटर पावसाची नोंद असल्याने व शासकीय परिपत्रकातील अटी शर्ती नुसार धोडी कुटुंबाला भरपाई मिळणे त्यांचा अधिकार असल्याचे आढळून आले. त्यांनी ते प्रकरण संमत केले आणि मंगळवारी बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे यांच्या हस्ते सुभाष यांच्या पत्नी लता धोडी यांना ४ लाखांचा धनादेश देण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार खटके उपस्थित होते. (वार्ताहर)