वसईतील प्रसिद्ध फ्रान्सिस्कन चर्चची दुरवस्था, कमानीवरील दगड निखळण्याच्या स्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 12:14 AM2020-01-22T00:14:59+5:302020-01-22T00:15:26+5:30

वसईच्या रणवीर चिमाजी अप्पा किल्ल्यात असलेल्या १६ व्या शतकातील फ्रान्सिस्कन चर्चची दुरवस्था झाली आहे.

Famous Franciscan Church in Bad condition | वसईतील प्रसिद्ध फ्रान्सिस्कन चर्चची दुरवस्था, कमानीवरील दगड निखळण्याच्या स्थितीत

वसईतील प्रसिद्ध फ्रान्सिस्कन चर्चची दुरवस्था, कमानीवरील दगड निखळण्याच्या स्थितीत

Next

वसई : वसईच्या रणवीर चिमाजी अप्पा किल्ल्यात असलेल्या १६ व्या शतकातील फ्रान्सिस्कन चर्चची दुरवस्था झाली आहे. या चर्चमधील दगडी कमान धोकादायक झाली असून त्यातीत दगड निखळत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पुरातत्त्व खात्याने तात्पुरती सोय म्हणून या कमानीबाहेर बांबूंचा अडथळा उभा केला आहे. दरम्यान, वसई किल्ल्यातील विविध ऐतिहासिक वास्तू सध्या मरणासन्न अवस्थेत असून त्यांचे संवर्धन करण्याची महत्त्वाची मागणी इतिहास व किल्लेप्रेमींनी केली आहे.

वसईच्या रणवीर चिमाजी आप्पांच्या किल्ल्यात दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी हौशी पर्यटक, इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमी नागरिक भेटी देत असतात. एका बाजूला असलेली वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला स्थानिक मच्छीमारांची वस्ती आणि विस्तीर्ण किनारपट्टी पाहण्यासाठी पर्यटकांची किल्ल्यात सतत रेलचेल असते. मात्र किल्ल्यातील पोर्तुगीजकालीन अनेक दगडी बांधकामांना उतरती कळा लागली आहे. किल्ल्यातील फ्रान्सिस्कन चर्च येथे असलेल्या मुख्य कमानीचे पुरातन बांधकामातील वजनदार दगड निखळून कोसळण्याच्या अवस्थेत आहेत.

फ्रान्सिस्कन चर्चच्या मुख्य कमानीतील १५० किलो वजनाचा दगड गेल्या वर्षी खाली कोसळला होता. या वेळी काही पर्यटक चर्चमध्ये होते. मात्र, कमानीखाली कोणी नव्हते. त्यामुळे केवळ सुदैवाने कोणाला इजा झाली नाही. ज्या शिलालेखावर हा दगड पडला होता, त्या शिलालेखाला तडा गेला असून आता याच कमानीतील इतर दगडही निखळण्याच्या स्थितीत आहेत. एकूणच या संदर्भात सावधगिरीचा उपाय म्हणून पुरातत्त्व खात्याच्या कर्मचाऱ्यांनी या कमानीखाली जाण्यास पर्यटकांना मज्जाव केला असून त्यांना कमानीबाहेरच रोखण्यासाठी तात्पुरता बांबूंचा अडथळा तयार केला आहे.

पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी ‘प्रवेश बंद’चा फलक लावून त्वरित या कमानीच्या संवर्धनाचे काम सुरू करावे आणि जे दगड निखळण्याच्या स्थितीत आले आहेत, त्यांच्यावर योग्य ते दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
यासंदर्भात पुरातत्त्व खात्याच्या वसई किल्ल्यातील कार्यालयाशी संपर्क साधला असता, संत फ्रन्सिस्कन चर्चची परिस्थिती धोकादायक आहे. यासाठी आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी पर्यटकांना धोक्याचा इशारा देणारे बॅनर लावले होते. मात्र, क्रिकेट खेळायला येणारी स्थानिक मुले बॅनरची नासधूस करतात. मात्र, आम्ही त्या ठिकाणी बांबूंचा अडथळा तयार करून पर्यटकांना कमानीखाली जाण्यास प्रतिबंध केला असल्याचे सांगितले. केवळ देशीच नव्हे तर विदेशी पर्यटकही आकर्षणापोटी या किल्ल्यात येतात. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने किल्ल्यातील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून त्यावर उपाययोजना त्वरित करायला हवी.

तातडीने लक्ष द्यावे
वसई किल्ल्यातील जवळपास दहा बुरूज सध्या वड, पिंपळ, खजुराची झाडे, अनावश्यक काटेरी झुडुपे यांच्या विळख्यात बंदिस्त झाले असून ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
वसईचा किल्ला समस्त दुर्गप्रेमींचे आकर्षण आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूंकडे पुरातत्त्व खात्याने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असे इतिहासकार डॉ. श्रीधर राऊत यांनी सांगितले.
 

Web Title: Famous Franciscan Church in Bad condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.